गोंदिया,
Arjuni Mor MLA Cultural Festival 2025 अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात भारतीय लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने ‘आमदार सांस्कृतिक महोत्सव २०२५’ चे आयोजन १९ ते २३ डिसेंबर या कालावधीत अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी येथे करण्यात आले आहे.
या महोत्सवाचे आयोजन आमदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले असून, संकल्पना माजी मंत्री तथा आमदार इंजि. राजकुमार बडोले यांची आहे. महोत्सवात १५० पेक्षा अधिक कलाकारांचा सहभाग असणार असून भारतीय लोकसंस्कृतीचे रंगमंचावर भव्य दर्शन घडणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. प्रफुल्ल पटेल राहतील. उद्धाटन जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजीमंत्री तथा आ. राजकुमार बडोले आहेत. यावेळी भाजपचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आ. परिणय फुके, माजी आ. राजेंद्र जैन, आ. विजय रहांगडाले, आ. विनोद अग्रवाल, आ. संजय पुराम, जिप अध्यक्ष लायकराम भेंडारकर, गोंदिया-भंडारा समन्वयक वीरेंद्र अंजनकर, राकाँ जिल्हाध्यक्ष प्रेम रहांगडाले, भाजप जिल्हाध्यक्ष सीता रहांगडाले, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेंद्र नायडू प्रामुख्याने उपस्थित राहतील. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पावा लाईव्ह म्युझिक अँड मेडिटेशन कार्यक्रमाचे आयोजन सडक अर्जुनी येथील आशीर्वाद लॉनमध्ये करण्यात आले आहे. महोत्सवांतर्गत दांडिया स्पर्धा २० डिसेंबर रोजी तर पारंपरिक नृत्य स्पर्धा २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता अर्जुनी मोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात होणार आहेत. या स्पर्धांमध्ये एकल व समूह नृत्यप्रकारांचा समावेश असून विजेत्यांना आकर्षक पारितोषिके व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. २२ डिसेंबर रोजी प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील यांचा सुमधूर कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तर २३ डिसेंबर २०२५ रोजी सुप्रसिद्ध गायक सवाई भट्ट यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होऊन महोत्सवाची सांगता होणार आहे. हा महोत्सव नागरिकांसाठी सांस्कृतिक पर्वणी ठरणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.