राजेश माहेश्वरी
आर्णी,
birth-death-registration : तालुक्यातील शहरापासून साधारणतः 15 किमीवर असलेला शेंदूरसनी गावाची लोकसंख्या केवळ 1 हजार 394 असून गाव 27 हजार 398 जन्म नोंदीमुळे संपूर्णर् देशात नावारूपास आले आहे. या गंभीर प्रकारामुळे गावात खळबळ उडाली असून गावकरीही अवाक झाले आहेत. या प्रकारामुळे भाजपाचे वरिष्ठ नेते परदेशी घुसखोरी रोखण्यासाठी कार्य करणारे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शेंदूरसनी गावाला भेट देऊन सखोल माहिती घेतली. हे भयंकर मोठे षडयंत्र असून याची गंभीरतेने चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पंचायत प्रशासनाला आता चौकशीच्या ससेमिèयाला सामोरे जावे लागत आहे. जन्म-मृत्यूच्या इतक्या नोंदी झाल्या याची जाणीव ग्रामपंचायत प्रशासनाला दिड वर्ष झाली नाही. मात्र हे माहित पडल्यावर सर्वत्र खळबळ उडाली. तालुक्यातील शेंदूरसनी येथे 1996 पर्यंत गटग्रामपंचायत होती. त्यानंतर ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला. एका छोट्याशा खोलीत ग्रामपंचायतचे कामकाज सुरू होते. चालू वर्षांत ग्रामपंचायत भवनला निधी मिळाला आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपात शाळेच्या वर्गखोलीत ग्रामपंचायतचे कामकाज सुरू आहे.
या गावात मोठी गोष्ट ऐकावयास मिळत आहे. मागील वर्षी 29 ते 31 जानेवारी या अवघ्या तीन दिवसांत सीआरएस सॉफ्टवेअरमध्ये या गावात जन्माच्या 27 हजार 398 नोंदी आढळून आल्या. ही बाब तपासणीअंती स्पष्ट झाली. सीआरएस सॉफ्टवेअरमध्ये 28 जानेवारी 2024 पर्यंत या गावात केवळ 41 जन्मनोंदी होत्या. त्यानंतर ता 29 व 30 जानेवारी या अवघ्या दोन दिवसांतच तब्बल 27 हजार 356 जन्म नोंदी सॉफ्टवेअरमध्ये नोंदवण्यात आल्या. 31 जानेवारीला केवळ एक नोंद झाली. मृत्यूच्याही 11 नोंदी आढळल्या.
उच्च प्राथमिक मराठी शाळेतील वर्गखोलीत थाटलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच रामदास वानखडे, ग्रामसेवक शुचिता काळे, उपसरपंच पंकज वानखडे यांनी सांगितले की, कुणीतरी या पोर्टल सॉफ्टवेअरची छेडछाड करून बोगस नोंदी केल्याचा संशय आहे.
एप्रिल 2024 मध्ये ग्रामसेवक महिलेची बदली होऊन नवीन ग्रामसेवक रुजू झाले. तेव्हापासून नवीन ग्रामसेवकाचा आयडी अपडेट झाला नव्हता. तो आता नोव्हेंबर 2025 मध्ये अपडेट झाला. त्यामुळे मधल्या काळात ग्रामपंचायतस्तरावर कुठल्याही नोंदी घेण्यात आल्या नाहीत, असे ग्रामपंचायत प्रशासनाचे म्हणणे आहे. मृत्यू नोंदीमधील चार नोंदी गावातील आहेत.
उर्वरित सात नोंदी बोगस असल्याचे तपासणीत समोर आले. एकंदरीत इतक्या मोठ्या प्रमाणात जन्म आणि मृत्यू नोंदी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शेंदूरसनीत अशा झाल्या जन्मनोंदी :
28 जानेवारी 2024 पर्यंत 41 जन्मनोंदी
29 जानेवारी 2024 - 2058
30 जानेवारी 2024 - 25298
31 जानेवारी 2024 - 1
डिसेंबर 2023 ते एप्रिल 2024 पर्यंत शेंदूरसनी सचिवपदाचा कार्यकाळ माझ्याकडे होता. माझ्या कार्यकाळातील 27 हजार 398 जन्मनोंदींपैकी एकच जन्मनोंद शेंदुरसनी ग्रामपंचायतीने केली असून, इतर 27 हजार 397 नोंदी शेंदूरसनी ग्रामपंचायत क्षेत्राबाहेरील बोगस आहेत. तसेच 11 मृत्यू नोंदीपैकी चार शेंदूरसनी गावातील असून, सात मृत्यू नोंदी शेंदूरसनी ग्रामपंचायत क्षेत्राबाहेरील आहेत.
- मोनाली गौरकर,
तत्कालीन ग्रामसेवक
ग्रामपंचायतीला स्वतंत्र इमारत नाही, शाळेच्या वर्गखोलीतच ग्रामपंचायतचा कारभार सुरू आहे. असे असताना 27 हजार 398 झालेल्या जन्मनोंदी सीएसआर पोर्टल हॅक करून कुणीतरी खोडसाळपणे केला. यातील एकमेव शेंदूरसनी गावातील जन्मनोंद आहे. इतर नोंदी क्षेत्राबाहेरील आहेत.
- शुचिता काळे,
ग्रामसेवक, शेंदूरसनी
ग्रामपंचायत शेंदूरसनी येथील जन्म व मृत्यू नोंदी बोगस आहेत. यामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाचा कोणताही हस्तक्षेप नाही. एका दिवशी 25 हजार 298 ऑनलाईन नोंदी करणे शक्य नाही. यावरून निदर्शनात येते की, यात काहीतरी गडबड झाली आहे.
- रामदास वानखडे,
सरपंच, शेंदूरसनी