मुंबई,
Sanjay Raut, उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महायुती सरकारवर तीव्र शब्दांत टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्याने राजकीय डावपेच खेळत असल्याचा आरोप केला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील ‘माणिक मोती गळाल्याचा’ संदर्भ देत त्यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर टीकेचे बाण सोडले, तसेच भविष्यात शिंदे गटाचे अस्तित्व राहील का, असा सवाल उपस्थित केला.
राऊत म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची धनंजय मुंडे यांनी घेतलेली भेट आणि त्यावरून निर्माण झालेले राजकीय संकेत चिंताजनक आहेत. अजूनही वाल्मिक कराड तुरुंगात असून खटला संपलेला नाही. अशा परिस्थितीत गंभीर आरोप असलेल्या व्यक्तींना मंत्रिमंडळात परत घेण्याचे पाप मुख्यमंत्री करतील, असे वाटत नाही. मात्र, फडणवीस मंत्रिमंडळातील एकाच गटाचे दोन मंत्री भ्रष्टाचार आणि गुंडागर्दीच्या आरोपांमुळे गेले, ही या सरकारवर लागलेली काळीमा असल्याचे त्यांनी नमूद केले. शिंदे गटातील असे असंख्य मंत्री असल्याचा दावा करत त्यांना तात्काळ बरखास्त करण्याची मागणीही त्यांनी केली.
सरकार पैशांच्या Sanjay Raut, बॅगा आणि अन्य गंभीर प्रकरणांकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप करत राऊत म्हणाले की, फडणवीस टप्प्याटप्प्याने गेम करतील आणि अखेरीस शेवटचा घाव शिंदे गटावरच घालतील, याची त्यांना पूर्ण खात्री आहे. माणिकराव कोकाटे यांना वाचवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत सुरू असल्याचे सांगत, सरकार या माध्यमातून “आम्ही भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालतो” असा संदेश देत असल्याचा आरोप त्यांनी केला. आमदार, खासदार, मंत्री असलेले भ्रष्टाचारी आमच्या पक्षात या, पूर्ण संरक्षण मिळेल— हाच संदेश दिला जात असल्याचे राऊत म्हणाले. अमित शाह आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीतूनही तोच संकेत दिला गेल्याचा आरोप त्यांनी केला.
राजकीय आघाड्यांबाबत बोलताना, अजित पवारांशी युती करणे म्हणजे भाजपशी हातमिळवणी असल्याचे आम्ही मानतो, असे स्पष्ट मत राऊतांनी व्यक्त केले. अजित पवार हे भाजपचे हस्तक असल्याचा आरोप करत, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांबाबत त्यांनी नाराजी दर्शवली.मुंबई महापालिकेच्या राजकारणावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, आज शरद पवार यांची भेट घेऊन आघाडीबाबत चर्चा होणार आहे. राज ठाकरे यांच्याशी चर्चाही सुरू असून काँग्रेसकडूनही संदेश आला आहे. आगामी काळात मुंबईचा महापौर हा ठाकरे बंधुंचाच असेल आणि तो अस्सल मराठी माणूसच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.