म्यानमारमध्ये पुन्हा भूकंपाने हादरले

    दिनांक :18-Dec-2025
Total Views |
नेपिदाव,
Earthquake in Myanmar म्यानमारमध्ये गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे जाणवले असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.४ इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचे केंद्र २६.०७ अंश उत्तर अक्षांश आणि ९७.०० अंश पूर्व रेखांशावर असून, हा भूकंप सुमारे १०० किलोमीटर खोलीवर झाला. हादरे जाणवताच अनेक लोक घाबरून घराबाहेर पळाले, मात्र सध्या कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या नुकसानीचे वृत्त समोर आलेले नाही.
 

earthquake in myanmar 
 
म्यानमारची भौगोलिक रचना भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील मानली जाते. देशाला लांब किनारपट्टी लाभलेली असल्याने येथे मध्यम ते तीव्र भूकंपांसह त्सुनामीचाही धोका संभवतो. इंडियन, युरेशियन, सुंडा आणि बर्मा अशा चार प्रमुख टेक्टोनिक प्लेट्सच्या संधिस्थानावर म्यानमार वसलेला आहे. या प्लेट्समधील सततच्या भूगर्भीय हालचालींमुळे या भागात वारंवार भूकंप होतात.
अलिकडच्या काळात म्यानमारमध्ये भूकंपांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या नोंदीनुसार, यापूर्वी ११ डिसेंबर रोजी ३.८ तीव्रतेचा भूकंप झाला होता, तर त्याच्या एक दिवस आधी म्हणजे १० डिसेंबर रोजी १३८ किलोमीटर खोलीवर ४.६ तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला होता. सततच्या या भूकंपांच्या घटनांमुळे स्थानिक प्रशासन आणि नागरिक सतर्क झाले आहेत.