ब्रम्हपुरी,
farmer kidney extortion शेतकर्याला किडनी विकण्यास भाग पाडणार्या सावकरांवर कठोर कारवाई करा, अन्यथा जन आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे चंद्रपूर जिल्हा सहसचिव विनोद झोडगे यांनी शासनाला निवेदनातून दिला आहे.
माणुसकीला काळीमा फासणारी व संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात येणार्या मिंथूर या गावात घडली. रोशन सदाशिव कुळे या तरुण शेतकर्याने अवैध सावकारी करणार्यांकडून 1 लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. मात्र अवैध सावकारांनी एक लाख रुपयाच्या कर्जावर तब्बल 74 लाख रुपयाचे कर्जाच्या वसुलीचा तगादा लावला. मारपीट व अर्वांच्च शब्दात शिवीगाळ करून त्यास कर्जाची परतफेड करण्यासाठी किडनी विकाव्यास भाग पाडले. हा कृषीप्रधान म्हणविणार्या भारताची मान शरमेने खाली करण्याचा प्रकार आहे. या तरुण शेतकर्यावर कर्ज फेडण्यासाठी तगादा लावून सुरुवातीला त्यास दुचाकी, ट्रॅक्टर, साडेतीन एकर शेती विकण्यास भाग पाडले. त्यावरही भागले नाही म्हणून त्यास किडनी विकण्यास बाध्य केले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधीतांवर कठोर कारवाई करावी तसेच या टोळीकडून असे काही प्रकार यापुढे घडले आहे का, याचाही खुलासा होणे गरजेचे आहे. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई न झाल्यास भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन नागभीडचे तहसीलदार, ब्रम्हपुरीचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना देण्यात आले आहे.
निवेदन देताना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य डॉ. महेश कोपुलवार, विनोद झोडगे, केशव बानबले, अमोल मानापुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विनोद नवघडे, प्रहारचे राहुल पांडव आदी उपस्थित होते.