नवी दिल्ली,
Gadkari's reply to Priyanka Gandhi काँग्रेसच्या सरचिटणीस आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी गुरुवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे थेट भेटीची वेळ मागितल्याने सभागृहात लक्ष वेधले गेले. चंदीगड-शिमला महामार्गासंदर्भातील पूरक प्रश्न विचारताना प्रियांका गांधी यांनी सांगितले की, गेल्या जून महिन्यापासून त्या आपल्या मतदारसंघातील विविध समस्यांबाबत गडकरी यांची भेट घेण्यासाठी वेळ मागत आहेत, मात्र अद्याप त्यांना यश मिळालेले नाही. मी जूनपासून भेटीसाठी वेळ मागत आहे, कृपया मला थोडा वेळ द्या, असे त्या म्हणाल्या. यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्यांनी प्रियांका गांधी यांना प्रश्नोत्तराच्या तासानंतर थेट भेटायला येण्याचे आमंत्रण दिले. तुम्ही कधीही येऊ शकता, माझे दार नेहमी खुले आहे. कोणत्याही औपचारिक भेटीची गरज नाही,”असे गडकरी यांनी सांगितले.

दरम्यान, याच दिवशी नितीन गडकरी यांनी देशातील पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्थेबाबतही महत्त्वाची माहिती दिली. एका कार्यक्रमात त्यांनी बोलताना सांगितले की, देशातील महामार्ग बांधकामाचा वेग सध्या मंदावला असला तरी सरकारचे उद्दिष्ट दररोज ६० किलोमीटर रस्ते बांधण्याचे आहे. भारतमाला प्रकल्पांतर्गत सध्या कोणतेही नवीन प्रकल्प सुरू नसल्याने हा वेग कमी झाला असल्याचे त्यांनी नमूद केले. गडकरी यांनी पुढील ८ ते १० वर्षांत भारताच्या ऑटोमोबाईल उद्योगाला जागतिक स्तरावर अव्वल स्थानावर नेण्याचा सरकारचा निर्धारही व्यक्त केला. सध्या अमेरिकेचा ऑटोमोबाईल उद्योग सुमारे ७८ लाख कोटी रुपयांचा असून चीनचा ४७ लाख कोटी आणि भारताचा २२ लाख कोटी रुपयांचा असल्याची माहिती त्यांनी दिली. भारताच्या आर्थिक वाढीसाठी शेती क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचेही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.