पाटणा,
Gulf countries are angry with Nitish Kumar बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या एका कृतीमुळे देशासह परदेशातही तीव्र प्रतिक्रिया उमटत असून सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. पाटणा येथे नुकत्याच झालेल्या आयुष डॉक्टरांच्या नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमादरम्यान नितीश कुमार यांनी एका मुस्लिम महिला डॉक्टरला नियुक्तीपत्र देताना तिच्या चेहऱ्यावरचा बुरखा काढण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या व्हिडिओनंतर भारतातच नव्हे तर आखाती देशांमध्येही संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी या कृतीला असंवेदनशील आणि अपमानास्पद ठरवले असून काहींनी मात्र याकडे बुरख्यापासून मुक्तीच्या दृष्टिकोनातून पाहत नितीश कुमार यांचे समर्थनकेले आहे. मात्र विरोधकांची संख्या मोठी असून हा प्रकार धार्मिक भावना दुखावणारा असल्याचे म्हटले जात आहे.

नितीश कुमार यांचे हे वर्तन आता केवळ भारतीय माध्यमांपुरते मर्यादित राहिलेले नाही. तुर्की, कतारसह इतर आखाती देशांमधील माध्यमे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. पाकिस्तानमधील सोशल मीडिया वापरकर्त्यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत भारतात मुस्लिम असणे किती कठीण आहे, असे विधान केले आहे. अनेक आखाती माध्यमांनी दोन दशकांहून अधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्याच्या प्रतिमेशी हे वर्तन विसंगत असल्याची चिंता व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी अल जझीरानेही या घटनेवर सविस्तर लेख प्रसिद्ध केला आहे. या लेखात भारतातील मुस्लिमांविरुद्ध भेदभावाचे वातावरण पुन्हा एकदा समोर आल्याचे नमूद करण्यात आले आहे. भारतात मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असतानाही त्यांना सातत्याने भेदभावाचा सामना करावा लागत असल्याचे अल जझीराने म्हटले आहे. याचबरोबर ‘मिडल ईस्ट इव्हेंट्स’ या मीडिया संस्थेने नितीश कुमार यांच्या कृतीवर आधारित व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
X (माजी ट्विटर), इंस्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मध्यपूर्वेतील अनेक नामांकित मीडिया हाऊसेस आणि वापरकर्त्यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. ‘मिडल ईस्ट इव्हेंट्स’ने भारतात सुमारे २२ कोटी मुस्लिम असून ते देशाच्या लोकसंख्येच्या सुमारे १५ टक्के असल्याचा उल्लेख करत प्रश्न उपस्थित केला आहे. अनेक वापरकर्त्यांनी प्रतिक्रियांमध्ये भारतात मुस्लिमांविरुद्ध भेदभाव नवीन नाही, असे म्हटले आहे, तर काहींनी मुस्लिम महिलेचा बुरखा ओढणे हे छळाचे स्वरूप असल्याचे सांगत या प्रकरणात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. या संपूर्ण घटनेमुळे नितीश कुमार यांच्या भूमिकेवर देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून वाद अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.