डबवली,
Haryana: Kidnapping and murder हरियाणातील डबवली परिसरात एका चार वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी सकाळी गावाबाहेरील कालव्यात या मुलीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच डबवलीच्या पोलिस अधीक्षक निकिता खट्टर पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून मुलीचे कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.
नूर असे या चिमुकलीचे नाव असून ती तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिचे वडील दीपक हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दीपक आणि पूजा यांचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. नूर अजून शाळेत जाण्याच्या वयाचीही नव्हती. घरात आजी-आजोबा, काका असे सर्वच कुटुंबीय मजुरीवर अवलंबून होते. एकुलत्या एक मुलीच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.
रामपूरा बिश्नोईयान गावातून नूर बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली होती. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी आलेल्या एका तरुणाने नूरला काहीतरी खरेदी करून देतो असे सांगून सोबत नेले. गावाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हा तरुण मुलीला घेऊन जाताना कैद झाला असून हे फुटेज तपासासाठी महत्त्वाचे ठरले आहे. पोलिसांनी जलद कारवाई करत संबंधित तरुणाला अटक केली असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांनी संजयसह शेजारी राहणाऱ्या प्रेम कुमार आणि राजेश कुमार यांच्या कुटुंबावरही संशय व्यक्त केला आहे. जोपर्यंत सर्व संशयितांवर कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे.