सतिश वखरे
हिंगणघाट,
municipal-council-elections : बर्याच काळापासून रखडलेल्या बहुचर्चीत नप निवडणुका एकदाच्या पार पडल्या. आता २१ रोजी निवडून येणारा लोकप्रतिनिधी १० कोटी खर्च करून बांधलेल्या आलिशान नव्या कोर्या नपच्या इमारतीवर आपला प्रवेश करतील. शहर विकासासाठी असलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत हा उमेदवारच्या गुणवंत्तेपेक्षा मुख्य मुद्दा जात, पैसा आणि दारू या चर्चेनेच अधिक रंगल्या. उमेदवारी जाहीर झाल्यापासून शहरानजिक राष्ट्रीय महामार्गावरील सर्व हॉटेल्स, धाबे एकदम फुल अन् सारं वातावरण कुल कुल असताना उमेदवारांचा फुगलेला खिसा काही उत्साही खाली करत भाऊ तू कसा निवडून येतो? याचं गणित रंगवून उमेदवाराला सांगून उमेदवाराचा आत्मविश्वास वाढवीत होते.
अमुक प्रभागात कोणत्या जातींचे किती मतदार आहेत आणि आपलं गणित कसं फिट्ट बसते हे समजावून उमेदवाराचा उत्साह द्विगुणित करीत आपला घसा ओला करून घेत असल्याचे मजेदार दृश्य जागोजागी दिसून येतं होत. जाहीर सभेत विकासाच्या गप्पा हाणणारे खासगीत मात्र कोण किती पैसा खर्च करून राहिला आहे याचाच हिशोब मांडताना दिसत होता.
आपण राजकारणातील सर्वज्ञ आहोत असा आव आणणारे अनेक राजकीय पंडित वॉर्डा-वॉर्डातील गल्लीबोळात दिसत होते आणि आहेतही अन् निकालापर्यंत हे सक्रिय राहतील. एकदाचा निकाल लागला की हे मोकळे झालेले पंडित पुन्हा जिप, पंसच्या निवडणुकीसाठी सज्ज होतील. या निवडणुकीत भाजपा वगळता कोणत्याही पक्षाचा वरिष्ठ नेता या ठिकाणी आला नाही. भाजपाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आणून अर्धी लढाई जिंकली. ना. फडणवीस यांनी आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात कोणावरही टीका न करता केवळ आपले शहर विकासाचे व्हीजन सादर केले.
अन्य पक्षापैकी राकाचे अभ्यासू नेते व नपच्या राजकारणातील कीडा असलेले कायदे तज्ज्ञ अॅड. सुधीर कोठारी यांनी भाजपा समोर मोठे आव्हान उभे केले. भाजपा उमेदवार नयना तुळसकर यांची राजकारणातील पाटी कोरी असल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याची संधी कोणालाही मिळाली नाही. त्यांची स्वच्छ प्रतिमा, उच्चविद्याविभूषित असणे आणि सहजपणे संवाद साधण्याची शैली मतदारांना आकर्षित करून गेली. शरद पवार गटाच्या उमेदवार शुभांगी डोंगरे, उबाठाच्या निता धोबे या दोघी अनुभवी नगरसेविका आहेत. नगरअध्यक्षपदासाठी त्यांनी प्रचारात कोणतीही कसर ठेवली नाही. राकाँच्या योगिता घुसे यांचा राजकारणाशी प्रत्यक्ष संबंध नसला तरी माहेरी व सासरी असलेल्या राजकारणाच्या अनुभवावर त्यांनीही अॅड. कोठारी व राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात चांगली लढत दिली.
विशेष म्हणजे सर्व महिलां उमेदवार या यंदा उच्चशिक्षित होत्या. राजकारणात सुशिक्षित महिला उतरत आहे ही समाधानाची बाजू आहे. एकंदरीत सर्व प्रभागातील आढावा घेतला असता काही प्रभागात पैशाचा प्रचंड खेळ झाल्याची चर्चा आहे. जवळपास ५० ते ८० लाख पर्यत रक्कम काही प्रभागात खर्च झाल्याची चर्चा आहे.
युवा नेते डॉ. निर्मेश कोठारी यांचा या निवडणुकीतील भाषणाचा एक व्हिडीओ शहरात अजूनही चर्चेत आहे. एका प्रभागातील बुवाबाजी करून भोळ्या भाबड्या जनतेला अंधश्रद्धेत अडकवून त्यांचे वेगवेगळ्या मार्गाने शोषण करणार्या व्यक्तीवर बुवाबाजी करणारा दारू पैसे कसे वाटले यावर केलेली टिप्पणी चर्चेचा विषय आहे. एकंदरीत उमेदवारांच्या भाग्याचा फैसला दोन दिवसात होणार आहे. विकासापेक्षा जात, पैसा दारू या गोष्टीनेच ही निवडणूक अधिक गाजली.