चंद्रपूर,
illegal cattle transport, मूल पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोवंशांची अमानुष व अवैध वाहतूक करणार्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने गुरूवारी धडक कारवाई करीत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, 14 गोवंशांची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईत 7 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मूल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाबराडा बेघर वस्ती परिसरात पिकअप वाहन (एमएच 40 सीटी 4197) वर धाड टाकली. यावेळी चालक शेख रमजान शेख चांद (22) व नितेश शामराव राउत (25) यांना ताब्यात घेतले. वाहनाची पाहणी केली असता वाहनात 5 गोवंश तर वाहनाखाली बांधलेले 9 गोवंश असे 14 गोवंश (बैल) आढळून आले. या कारवाईत पिकअप वाहन व 14 गोवंश असा 7 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी अष्पाक कुरेशी (रा. गोंडपिपरी) हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपींविरुद्ध मूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवंशांना सुरक्षिततेच्या दृष्टीने छोटा नागपूर येथील प्यार फाउंडेशन येथे दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई उपविभाग मूल, ब्रम्हपुरी पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.