नवी दिल्ली,
Indian Railways record भारतीय रेल्वेने इतिहास रचला आहे. देशाच्या जीवनरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वेने आपल्या ब्रॉडगेज नेटवर्कच्या ९९.२ टक्के भागाचे विद्युतीकरण पूर्ण केले असून, बहुतेक गाड्या आता डिझेलऐवजी विजेवर धावतील. ही कामगिरी केवळ तांत्रिक प्रगती नाही, तर पर्यावरणाचे रक्षण आणि इंधन बचतीसाठीही महत्त्वाची ठरेल. या यशामुळे भारताने ब्रिटन, रशिया आणि चीनसारख्या प्रमुख देशांना मागे टाकले आहे, कारण या देशांच्या मोठ्या रेल्वे नेटवर्कचा अजूनही पूर्णपणे विद्युतीकरण झालेले नाही.रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये केवळ ३९%, रशियामध्ये ५२% आणि चीनमध्ये ८२% रेल्वे मार्ग विद्युतीकृत आहेत, तर भारत जवळजवळ १००% लक्ष्य गाठण्याच्या अगदी जवळ आहे. २०१४ ते २०२५ दरम्यान ४६,९०० रूट किलोमीटर रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले, जे मागील ६० वर्षांत साध्य झालेल्या विद्युतीकरणाच्या दुप्पट आहे.
आज देशातील १४ रेल्वे झोन पूर्णपणे विद्युतीकरण झाले आहेत, ज्यात मध्य, पूर्व, उत्तर आणि पश्चिम रेल्वा यांचा समावेश आहे. २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या ब्रॉडगेज नेटवर्कचे पूर्ण विद्युतीकरण साध्य केले आहे. ईशान्य भारतात अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, त्रिपुरा आणि मिझोरममध्ये संपूर्ण नेटवर्क विद्युतीकरण झाले असून, आसाम ९२% विद्युतीकरणासह अंतिम टप्प्यात आहे. विद्युतीकरणामुळे पर्यावरणावर मोठा फायदा होईल. रेल्वे वाहतूक रस्ते वाहतुकीच्या तुलनेत अंदाजे ८९ टक्के कमी कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित करते. रस्त्याने प्रति किलोमीटर एक टन वस्तूंची वाहतूक करताना १०१ ग्रॅम कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होते, तर रेल्वेने तेच फक्त ११.५ ग्रॅम उत्सर्जित केले जाते. यामुळे भारतीय रेल्वे हरित वाहतुकीचा मुख्य आधार बनली आहे. विद्युतीकरणासह, देशभरातील २,६२६ रेल्वे स्थानकांवर ८९८ मेगावॅट सौर ऊर्जा कार्यान्वित करण्यात आली आहे. सरकारचे उद्दिष्ट २०३० पर्यंत भारतीय रेल्वेला निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक बनवणे आहे.