मोठी बातमी! आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी रॅकेटचा पर्दाफाश

    दिनांक :18-Dec-2025
Total Views |
पुणे,
Pune police drug bust पुणे पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीतील एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करत देशातील विविध शहरांतून पाच जणांना अटक केली आहे. पुण्यासह मुंबई, गोवा आणि गुवाहाटी येथे एकाचवेळी कारवाई करत पोलिसांनी तब्बल ३ कोटी ४५ लाख रुपयांचा अमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत आरोपींच्या विविध बँक खात्यांमधील, क्रिप्टो वॉलेटमधील तसेच परदेशी चलनातील सुमारे ७ लाख ८० हजार रुपयांची रक्कम गोठवण्यात आली आहे.
 

Pune police drug bust 
पुणे पोलीस परिमंडळ ४ अंतर्गत येणाऱ्या खडकी पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी आणि गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने संयुक्तपणे ही धडक कारवाई केली. काही दिवसांपूर्वी खडकी पोलिसांनी तुषार चेतन वर्मा (वय २१) या तरुणाला अमली पदार्थ तस्करीप्रकरणी अटक केली होती. त्याच्याकडील चौकशीतून या संपूर्ण रॅकेटचा धागा उलगडत गेला आणि तपासाची व्याप्ती आंतरराज्य तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढवण्यात आली.तपासात निष्पन्न झाले की, तुषार वर्मा हा सुमित संतोष डेडवाल आणि अक्षय सुखलाल महेर यांच्याकडून अमली पदार्थांची खरेदी करत होता. या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी पिंपरी-चिंचवड परिसरात एक फ्लॅट भाड्याने घेऊन त्याठिकाणी चक्क हायड्रोपोनिक पद्धतीने गांजाची शेती उभारल्याचे उघड झाले. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून शेती उद्ध्वस्त करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले.
 
 
यानंतर तांत्रिक Pune police drug bust विश्लेषणाच्या आधारे तपास अधिक तीव्र करत पोलिसांनी मुंबई आणि गोवा येथे छापे टाकले. या कारवाईत मलय राजेश डेलीवाला या कुख्यात ड्रग्स पेडलरला अटक करण्यात आली. तपासात समोर आले की, हे सर्व आरोपी डार्क वेबचा वापर करून अमली पदार्थांची खरेदी-विक्री करत होते. मुख्य आरोपी तुषार वर्मा याने डार्क वेबवर स्वतःसाठी “अलख निरंजन” हे कोड नेम वापरले होते. आर्थिक व्यवहारांवर पोलिसांचा संशय येऊ नये म्हणून संपूर्ण देवाणघेवाण क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून केली जात होती.
 
 
या प्रकरणाचे धागेदोरे Pune police drug bust केवळ भारतापुरते मर्यादित नसून थायलंड, भूतानसारख्या देशांपर्यंत पोहोचल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या रॅकेटशी संबंधित आणखी पाच जणांचा शोध पोलीस घेत असून त्यापैकी काहीजण परदेशी नागरिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.धक्कादायक बाब म्हणजे, अमली पदार्थांची डिलिव्हरी करण्यासाठी काही आरोपी ऑनलाइन डिलिव्हरी अॅप्लिकेशन्सचा वापर करत असल्याचेही तपासात समोर आले आहे. मागणीप्रमाणे या अॅप्सच्या माध्यमातून ड्रग्सची विक्री केली जात होती. संबंधित ऑनलाइन डिलिव्हरी अॅप कंपन्यांच्या मालकांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
या संपूर्ण कारवाईत विविध प्रकारचे गांजा, चरस, सायकडेलिक मशरूम, एलएसडी, एमडी, टीएचसी ऑइल गमीज, पिल्स तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहे. सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून या प्रकरणाचा तपास अधिक सखोल पद्धतीने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.