हरवलेले शिक्षण ..!

    दिनांक :18-Dec-2025
Total Views |
 
 वेध ...
नंदकिशोर काथवटे,
9922999588
 
education आज शिक्षण हा विषय केवळ धोरणांचा किंवा अभ्यासक्रमाचा राहिलेला नाही, तर तो थेट समाजाच्या भवितव्याशी जोडलेला गंभीर प्रश्न बनला आहे. कधीकाळी गुरुकुल पद्धतीत राजा असो वा रंक, श्रीमंत असो वा गरीब, सर्व मुले एकाच आश्रमात, एकाच गुरुकुलात समान शिक्षण घेत होती. ज्ञानासोबत शिस्त, संयम, कष्ट, मूल्ये आणि माणूसपण घडवले जात होते. आज मात्र ‘कॉन्व्हेंट संस्कृती’ने शिक्षणाचे मूळ उद्दिष्टच बदलून टाकले आहे. सरकारी शाळा म्हणजे गरिबांची आणि कॉन्व्हेंट म्हणजे प्रतिष्ठेचे, यशाचे प्रतीक, असा धोकादायक भ्रम समाजाच्या मनात पद्धतशीरपणे रुजवला गेला आहे.
 


गुरुकुल  
 
 
सरकारी शाळांची अवस्था आज अत्यंत विदारक झाली आहे. इमारती आहेत, शिक्षक आहेत, पगार आहेत; मात्र विश्वास उरलेला नाही. या शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक सरकारकडून नियमित पगार घेतात, पण त्यांची स्वतःची मुले त्याच शाळांमध्ये शिक्षण घेत नाहीत, ही वस्तुस्थिती कुणालाही अस्वस्थ करणारी आहे. लाखो रुपये फी भरून तीच मुले खासगी कॉन्व्हेंटमध्ये शिकतात. मग एक मूलभूत प्रश्न उभा राहतो-जे शिक्षक आपल्या शाळेत आपल्या मुलांना घालायला तयार नाहीत, ते इतर पालकांना त्या शाळेवर विश्वास ठेवायला कसे सांगू शकतात? की सरकारला हे सगळे दिसत असूनही ते मुद्दाम डोळ्यांवर झापड बांधून बसले आहे? ‘आम्ही सरकारकडून अनुदान घेत नाही, त्यामुळे आम्हाला नियम लागू होत नाहीत’ या सबबीखाली गल्लीबोळात, वसाहतींमध्ये कॉन्व्हेंट उभे राहिले. शिक्षणाचा अक्षरशः बाजार मांडला गेला. फी ठरवताना कोणताही निकष नाही, कोणतीही मर्यादा नाही. रिक्षावाल्यापासून ते मध्यमवर्गीय नोकरदार पालकांपर्यंत सगळेच कर्ज काढून, गरजा बाजूला सारून आपल्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये घालू लागले. पालकांच्या मनात भीती निर्माण करण्यात आली-इथे नाही घातलं तर मूल मागे पडेल, स्पर्धेत टिकणार नाही, समाजात स्थान मिळणार नाही. पण या महागड्या शिक्षणातून मुलांच्या हाती नेमकं काय येतं? ना धड इंग्रजी येतं, ना नीट मराठी येतं. विचार करण्याची क्षमता कमी होते, प्रश्न विचारण्याची सवय नष्ट होते. संस्कार, क्रीडा, कला, समाजभान या सगळ्या गोष्टी अभ्यासाच्या ओझ्याखाली गाडल्या जातात. मोबाईल आणि तथाकथित तंत्रज्ञानाच्या नावाखाली मुलांचे बालपण हिरावून घेतले जाते. खेळाच्या मैदानाऐवजी स्क्रीन, संवादाऐवजी रील्स आणि संवेदनशीलतेऐवजी स्पर्धा अशी पिढी घडवली जात आहे. या कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला की त्याच शाळेतून पुस्तके घ्यायची, त्यांनी सांगितलेल्या दुकानातूनच गणवेश खरेदी करायचा, गॅदरिंग, इव्हेंट, फंक्शन यांच्या नावाखाली वर्षानुवर्षे पालकांकडून पैसे उकळायचे. हे सर्व माहिती असूनही त्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून पालकांची धडपड सुरूच असते. कारण पर्याय उरलेला नाही, अशी भावना त्यांच्यात रुजवली गेली आहे. शिक्षणाची पूर्णपणे वाट लागली आहे, हे स्पष्ट दिसत असतानाही सरकार याकडे पाहायला तयार नाही. भारतामध्ये सर्वाधिक काळा व्यवसाय शिक्षण क्षेत्रात चालतो, असे ठामपणे सांगितले जाते. तरीही या व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याची ना राजकीय इच्छाशक्ती दिसते, ना प्रशासकीय गंभीरता. कधी काळी सरकारी शाळांतून शास्त्रज्ञ, डॉक्टर, वकील, अभियंते, लेखक, पत्रकार आणि उद्योजक घडत होते. आज त्या शाळा ओस पडत चालल्या आहेत आणि भविष्यातील पिढी फी भरणारी पण विचारशून्य होत चालली आहे. जो समाज शिक्षणाला व्यापार बनवतो, तो समाज आपल्या भविष्याशीच तडजोड करतो. माणूस घडवणाèया शिक्षणाऐवजी ग्राहक तयार करणारी व्यवस्था निर्माण झाली आहे.education या कॉन्व्हेंट संस्कृतीवर वेळीच लगाम घातला नाही, तर विचाराने सुदृढ, मूल्यनिष्ठ आणि समाजाशी नातं जपणारी पिढी घडवणं अशक्य होईल. शिक्षण म्हणजे इमारत, फी आणि इंग्रजी माध्यम नव्हे; शिक्षण म्हणजे माणूस घडवण्याची प्रक्रिया आहे, हे पुन्हा एकदा ठामपणे स्वीकारण्याची हीच योग्य वेळ आहे. आज पालकांच्या मनात शिक्षणाबाबत विश्वासापेक्षा भीती अधिक आहे. आपलं मूल मागे राहू नये या भीतीचा फायदा घेत शिक्षणसंस्थांनी पालकांना मानसिक गुलाम बनवले आहे. मूल शिकतंय की नाही, समजतंय की नाही, आनंदी आहे की नाही, यापेक्षा रिपोर्ट कार्डवरचे ग्रेड, स्पर्धा परीक्षा, रँक यालाच महत्त्व दिलं जातं. परिणामी मुलं ताणतणावाखाली वाढत आहेत. आत्मविश्वासाऐवजी न्यूनगंड, जिज्ञासेपेक्षा यांत्रिक पाठांतर आणि आनंदाऐवजी सततची चढाओढ त्यांच्या आयुष्याचा भाग बनत आहे. शिक्षणाने मोकळं करणं अपेक्षित असताना तेच शिक्षण मुलांना गुदमरवू लागलं आहे. सरकारी शाळा वाचवायच्या असतील तर फक्त इमारती रंगवून उपयोग नाही. तिथे शिकणाèया मुलांना आत्मसन्मान, दर्जेदार शिक्षक, आधुनिक साधने आणि समाजाचा विश्वास परत मिळवून द्यावा लागेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे धोरणकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सरकारी शाळांवर विश्वास दाखवला पाहिजे. अन्यथा शिक्षणाचा हा व्यापार असाच फोफावत राहील आणि समाज विचारहीन, संस्कारहीन पिढीच्या दिशेने वाटचाल करत राहील. आज नाही तर उद्या, या दुर्लक्षाची किंमत आपल्यालाच मोजावी लागणार आहे.
--------------