माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनच अटक होणार?

    दिनांक :18-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Manikrao Kokate has been arrested १९९५ मध्ये शासकीय सदनिका मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करून सरकारची फसवणूक केल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांच्यावरील दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा कायम ठेवल्यानंतर प्रथम वर्ग न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याने पोलिस यंत्रणा सक्रिय झाली आहे. सध्या माणिकराव कोकाटे मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांच्या अटकेबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.
 
 

kokate 
या पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रकरणाची संपूर्ण माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मागवली आहे. कोकाटेंची सध्याची वैद्यकीय स्थिती, डॉक्टरांचा अहवाल आणि कायदेशीर बाबींचा बारकाईने अभ्यास केला जात असून, त्यानंतरच पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे. या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यासोबतच त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्याविरोधातही अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. विजय कोकाटे सध्या कुठे आहेत याची माहिती मिळत नसल्याने नाशिक पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असून, विविध ठिकाणी पथके पाठवण्यात आली आहेत.
 
कोकाटे बंधूंवर १९९५ साली कागदपत्रांत फेरफार करून शासकीय सदनिका मिळवल्याचा आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने दोघांनाही दोन वर्षांची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे. जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवल्यामुळे त्यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. एकीकडे माणिकराव कोकाटे यांच्यावर सुरू असलेले रुग्णालयातील उपचार लक्षात घेता पोलिसांची कारवाई सध्या कायदेशीर तपासणीच्या टप्प्यावर आहे, तर दुसरीकडे विजय कोकाटेंना शोधण्यासाठी पोलिसांकडून हालचाली वेगाने सुरू आहेत. आता नाशिक पोलीस कोणता निर्णय घेतात, माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनच अटक होणार का आणि विजय कोकाटे पोलिसांच्या ताब्यात येतात का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.