वर्धा,
MNREGA : महात्मा गांधींचे नाव मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना)मधून हटवण्याच्या विरोधात महिला काँग्रेस कमिटीने आज गुरुवार १८ रोजी तीव्र आंदोलन केले. काँग्रेसच्या महिला अध्यक्ष अल्का लांबा यांच्या निर्देशावरून संध्या सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अरुणा धोटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले.
मनरेगा ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. जी ग्रामीण भागातील कुटुंबांना वर्षभरात १०० दिवस रोजगाराची हमी देऊन त्यांना मदत करते. या योजनेचा फायदा ग्रामीण जनतेला मोठ्या प्रमाणावर होत आहे. महात्मा गांधी हे संपूर्ण जगात महात्मा या नावाने ओळखले जातात. त्यांना सर्व विश्वाने नमन केले आहे. त्यामुळे या योजनेचं नाव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असेच रहायला हवे, असा स्पष्ट इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारविरुद्ध घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हा प्रशासनामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविले.
आंदोलनात वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, बाळा जगताप, मनीषा फिसके, रोशना जामलेकर, राजू वानखेडे, अविनाश इंदुरकर, मनोज चौधरी, पंकज काचोळे, सतीश भावरकर, गोविंद दिघीकर, राहुल सुरकार, संगीता ठवळे, स्वरूपा हजारे, ऋतुजा भोयर, वनीता मरसकोल्हे, वंदना चिडाम, यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.