मनपा निवडणुकांमुळे २००हून अधिक परीक्षांच्या वेळापत्रकांत बदल

    दिनांक :18-Dec-2025
Total Views |
नागपूर, 
municipal-elections : आगामी महिन्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ७०हून अधिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे संशोधित वेळापत्रक बुधवारी जाहीर केले आहे. या बदलामुळे व्यावसायिक व अव्यावसायिक अशा २००पेक्षा अधिक परीक्षांचे पुनर्नियोजन करण्यात आले आहे. येत्या दिनांक १४ ते १६ जानेवारी दरम्यान होणाऱ्या मनपा निवडणुकांच्या काळात मोठ्या प्रमाणावर परीक्षा नियोजित होत्या.
 
 
 
RTMNU
 
 
 
निवडणूक प्रक्रियेमुळे निर्माण होणाऱ्या प्रशासकीय जबाबदाऱ्या लक्षात घेऊन परीक्षा विभागाने सखोल पुनर्विचार करून नव्या वेळापत्रकाला अंतिम स्वरूप दिले असून, ते विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार विज्ञान व तंत्रज्ञान संकाय, आंतरविषय अध्ययन संकाय तसेच मानविकी संकायाच्या परीक्षांच्या तारखांमध्ये प्रामुख्याने बदल करण्यात आला आहे. संबंधित सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा अंतिम परीक्षेनंतर लगेचच घेण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही, असा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला आहे. विद्यापीठ अधिकाऱ्यांच्या मते, निवडणूक प्रक्रियेतील प्रशासकीय कामकाज आणि परीक्षा संचालन या दोन्ही गोष्टी सुरळीत पार पडाव्यात, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देण्यात आले आहे.