नागपूर,
nagpur-news : लोकशिक्षण संस्था संचालित म. पां. देव स्मृती लोकांची शाळेचा तपपूर्ती स्नेहमीलन सोहळा उत्साहात झाला. ग्रेट नाग रोडवरील शाळेच्या प्रांगणात झालेल्या माजी विद्यार्थिनी सोहळ्याला विविध तुकड्यांच्या विद्यार्थिनींची उपस्थिती होती. ढोलताशांच्या गजरात माजी विद्यार्थिनी तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. ‘सृष्टी तुला वाहुनी माते, अशी रूप संपन्न तू निस्तुला’ ही शाळेची प्रार्थना म्हणण्यात आली. त्यानंतर दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विद्यार्थिनींद्वारे ‘शाकुंतल’ या संगीतनाटकातील ‘पंचतुंड नररुंडमालधर...’ या नांदीचे सादरीकरण झाले.
शंखनाद करून सांस्कृतिक कार्यक्रमांचा श्रीगणेशा झाला. सत्तरीतल्या विद्यार्थिनींनी ‘शाळेवर बोलू काही’ हा धमाल कार्यक्रम सादर केला. यानंतर प्रत्येक तुकडीने एकल तसेच समूह नृत्य सादर केले. काहींनी गाणी, कविता सादर केल्यात. प्रश्नोत्तरी, सुविचार, म्हणी, शाळेतील गमतीदार आठवणींचे धमाल सादरीकरण झाले.
शाळेची आठवण म्हणून सर्वांना आकर्षक स्मृतिचिन्ह देण्यात आले. या कार्यक्रमाची संकल्पना डॉ. विजया विलास जोशी यांची होती. सोहळ्याच्या यशस्वितेसाठी आयोजन समितीच्या सदस्य प्रतिमा आकरे, डॉ. निशा कुळकर्णी-कानेटकर, डॉ. अनघा नाशीरकर-देसाई, डॉ विभा भुसारी, सुषमा ओझा, शिल्पा लाभे, सोनाली लुटे, अर्चना निंबुळकर-टोंग, मृणाल दाणी, स्वाती खारपाटे, डॉ. प्रज्ञा देशपांडे, अर्चना मावकर, कविता इसारकर, सुषमा गोखले-चाफेकर, उमा सोमण, विद्यमान मुख्याध्यापिका रजनी राजुरकर यांचे सहकार्य लाभले.