प्रज्ञा सातव यांनी दिला काँग्रेस आमदारकीचा राजीनामा

    दिनांक :18-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Pradnya Satav resigns काँग्रेसच्या विधानपरिषदेतील आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी पक्षातील आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी हा राजीनामा विधीमंडळ सचिवांकडे सुपूर्द केला असून, त्यामुळे त्यांच्या भाजपमध्ये प्रवेशावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा जोर धरली होती. आजच त्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
 

pradnya satav 
काँग्रेस विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या पक्षप्रवेशाबाबत तथ्य नसल्याचे म्हटले असले, तरी प्रज्ञा सातव यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय समीकरणांना वेग आला आहे. स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेवर संधी दिली होती. राजीव सातव हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय सहकारी होते, मात्र कोरोना महामारीदरम्यान त्यांच्या अकाली निधनामुळे काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती.
राजीनामा देण्यासाठी प्रज्ञा सातव समर्थकांसह उपस्थित होत्या. हिंगोलीतून आलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली आणि 'राजीव सातव अमर रहे' असे नारे देण्यात आले. मोठ्या संख्येने सातव यांचे कार्यकर्ते भाजप कार्यालयात दाखल झाले. डॉ. प्रज्ञा सातव हे दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांचे पत्नी आहेत. त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष होत्या आणि विधानपरिषदेच्या आमदार होत्या. २०२१ मध्ये काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्या बिनविरोध निवडून आल्या. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्या काँग्रेसकडून दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आल्या. त्यांचा कार्यकाळ २०३० पर्यंत होता, मात्र आज दिलेल्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधील त्यांचा प्रवास थांबला आहे.