नवी दिल्ली,
Puran Poli on Vande Bharat वंदे भारत एक्सप्रेसमधील प्रवाशांना आता प्रवासादरम्यान स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत गाड्यांमध्ये प्रादेशिक पदार्थ देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला असून, महाराष्ट्रातून धावणाऱ्या वंदे भारतमध्ये झणझणीत मिसळ, चविष्ट पुरणपोळी यांसारखे मराठमोळे पदार्थ मिळणार आहेत. सध्या देशभरात १६४ हून अधिक वंदे भारत एक्सप्रेस धावत असून उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि दिल्ली या राज्यांमध्ये त्यांची संख्या सर्वाधिक आहे.
दिल्ली येथे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू देखील उपस्थित होते. वंदे भारत एक्सप्रेस ज्या प्रदेशातून धावते, त्या भागातील वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ प्रवाशांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासात स्थानिक संस्कृतीचा अनुभव मिळेल आणि गाडीशी आपलेपणाची भावना निर्माण होईल, असा रेल्वे मंत्रालयाचा विश्वास आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रादेशिक खाद्यपदार्थांची ही योजना पहिल्या टप्प्यात वंदे भारत गाड्यांमध्ये राबवली जाईल. त्यानंतर हळूहळू इतर गाड्यांमध्येही या सुविधेचा विस्तार करण्यात येणार आहे. प्रादेशिक विविधतेला प्रोत्साहन देणे आणि प्रवाशांचा अनुभव अधिक समृद्ध करणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.
याच बैठकीत तिकिट प्रणालीतील सुधारणांवरही चर्चा करण्यात आली. बनावट किंवा डुप्लिकेट ओळखपत्रांचा वापर करून होणारे तिकीट बुकिंग रोखण्यासाठी आयआरसीटीसी प्लॅटफॉर्मवर युजर व्हेरिफिकेशन अधिक कडक करण्यात आले आहे. या उपाययोजनांमुळे दररोज होणाऱ्या नवीन नोंदण्या एक लाखांवरून सुमारे पाच हजारांपर्यंत कमी झाल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत ३.०३ कोटी बनावट खाती बंद करण्यात आली असून २.७ कोटी खाती तात्पुरती निलंबित करण्यात आली आहेत. या निर्णयामुळे तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.