राज ठाकरेंच्या दौऱ्यांनी राजकीय वातावरण तापलं

    दिनांक :18-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Raj Thackeray's tours आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, विशेषतः मुंबईतील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. बीएमसीवर कोणाचा झेंडा फडकेल, याची उत्सुकता नेते, कार्यकर्ते आणि सामान्य मतदारांमध्ये दिसून येत आहे. या निवडणुकीला विशेष महत्त्व मिळण्यामागे ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्र येण्याची चर्चा हेही एक मोठे कारण ठरत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील युतीबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असून, अधिकृत घोषणेचीच प्रतीक्षा असल्याचे संकेत मिळत आहेत. अशा पार्श्वभूमीवर खुद्द राज ठाकरे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याची तयारी करत असून, येत्या काही दिवसांत ते मुंबई पिंजून काढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 
rajthakre
बीएमसी निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राज ठाकरे 20 डिसेंबर 2025 रोजी पूर्व उपनगर आणि दक्षिण मुंबईचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते मनसेच्या निवडणूक कार्यालयांना आणि शाखांना भेट देणार असून, काही ठिकाणी नव्या निवडणूक कार्यालयांचे उद्घाटनही करणार आहेत. दुसऱ्या दिवशी, 21 डिसेंबर रोजी ते पश्चिम उपनगरातील आठ विधानसभा मतदारसंघांचा दौरा करणार असून, अमराठी मतदार मोठ्या संख्येने असलेल्या मतदारसंघांवरही मनसेचे विशेष लक्ष राहणार आहे. जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, दहिसर, बोरिवली, मागाठाणे, कांदिवली आणि दिंडोशी या भागांतील मनसे शाखांना ते भेट देणार आहेत. निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी संपूर्ण मुंबईत राज ठाकरे यांचे दौरे आखण्यात आल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
दरम्यान, दुसरीकडे महायुतीकडूनही जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मुंबईतील सर्व 227 प्रभागांमध्ये विजय सुनिश्चित करण्यासाठी शिवसेनेकडून उमेदवारांची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रंगशारदा येथे आज शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून, ज्या जागा शिवसेनेच्या वाट्याला येतील त्या ठिकाणचे उमेदवार याच प्रक्रियेतून निश्चित केले जाणार आहेत. ज्या प्रभागांमध्ये मित्र पक्षांचे उमेदवार असतील, त्या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी महायुतीच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळणार आहेत. मुंबईसह राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवण्यात येणार असून, 150 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवून ही रणनीती आखण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, शिवसेना उबाठा पक्षाकडूनही स्वतंत्र रणनिती आखली जात असून, उमेदवार निवडीत मोठा बदल करण्याचा विचार सुरू आहे. यावेळी जवळपास 70 टक्के नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. युवा सेनेतील अनेक कार्यकर्त्यांना थेट निवडणूक रिंगणात उतरवण्यात येणार असल्याने, मुंबई महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.