कारंजा
Savitrimai Jayanti celebration कारंजा कला क्रीडा अकादमी, गुरुकुल पब्लिक स्कूल आणि माळी महासंघ कारंजा तसेच कारंजा घाडगे शहरातील दानदात्यांच्या सहकार्याने येत्या ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीमाई जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरात स्वयंपाक, धुणी-भांडी व झाडू-पोचा घरकाम करणार्या सावित्रीच्या लेकींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुमित वानखेडे राहणार असून उद्घाटन मराठी चित्रपट यशवंतचे दिग्दर्शक, जुना फर्निचर चित्रपटाचे सहकलाकार पीयूष भोंडे यांच्या हस्ते माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉ. कमल गवई तसेच मिशन आयएएसचे संचालक डॉ. प्रा. नरेशचंद्र काठोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
या सोहळ्यात कारंजा शहरातील अनेक कुटुंबांकडे स्वयंपाक, धुणी, भांडी, झाडू, पोचा ही घरकामे करणार्या जवळपास ५० सावित्रीच्या लेकींचा पुष्पगुच्छ, पुस्तक, सन्मानचिन्ह तसेच साडीचोळी भेट देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सदर सन्मान सोहळ्यात शिक्षण क्षेत्रात सेवा दिलेल्या भारती प्रकाश धारपुरे व नीलिमा राजेश जोरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सन्मानचिन्ह देण्यात येईल. सुजाता कांबळे, संगीता कुरमेती, राजेश जोरे, अॅड. प्रकाश धारपुरे, शुभम वानखडे, रवी राऊतकर, राहुल पैठणे, संजय सातपुरे, प्रल्हाद (पैलू) मोटवानी, डॉ. दादाराव रामटेके, प्रा. डॉ. गणेश मोहोड, राजू डोंगरे, रमेश नांदणे, प्रा. नेत्राम ढोबाळे, आदी दानदात्यांनी आर्थिक सहकार्य केले आहे. मी सावित्री बोलतेय ही नाट्यछटा गुरुकुलतर्फे सादर केल्या जाणार आहे. शहरात प्रथमच होत असलेल्या घरकाम करणार्या सावित्रीमाईच्या लेकीच्या सन्मान सोहळ्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य आयोजक कारंजा कला क्रीडा अकादमीचे अध्यक्ष विलास वानखेडे, गुरुकुल पब्लिक स्कूलचे सचिव अजय भोकरे आणि माळी महासंघाचे संजय कदम यांनी केले आहे.