देवरी,
MIDC शहरालगत असलेल्या एमआयडीसी परिसरात सुफलाम कंपनीचा मनमर्जी कारभार सुरू असून परिसरातील गावांसाठी डोकेदुखीचा होत आहे. कंपनीमधून निघणारा विषारी वायू व रसायनयुक्त पाण्याने अनेक गावातील पिक, जनावर व नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत. प्रशासनाने याची दखल घेवून सुफलाम कंपनीच्या सुरू असलेल्या मनमर्जी कारभारावर ब्रेक लावावा, अशी मागणी शिवसेना आदिवासी विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आ. सहषराम कोरोटे यांनी केली आहे. या संदर्भात १७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकार्यांची भेट घेवून मागणीचे निवेदन दिले.
स्थानिक एमआयडीसी अंतर्गत उभारण्यात आलेली सुफलाम कंपनीच्या कारभाराने परिसरातील गावकरी अडचणीत आले आहेत. नियमांना वेशीवर टांगून कंपनीचा कारभार सुरू आहे. कंपनीकडून रसायनयुक्त वेस्टज पाणी भागी नाल्यात सोडले जात आहे. यामुळे परिसरातील पिकांवर त्यांचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. शिवाय नाल्याच्या पाण्यावर तहान भागविणारे जनावरे आजारी पडत आहे. यामुळे शेतकरी व पशुपालकांची चिंता वाढली आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतजमिनीची पोत व गुणवत्ता घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे यावर आळा घालण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या संदर्भात प्रशासन व कंपनी व्यवस्थापनाकडे तक्रार करण्यात आली. परंतु, सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे लक्ष देवून कंपनीकडून सोडण्यात येणारे रसायनयुक्त पाणी त्वरित बंद करावे, अशी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना माजी आ. कोरोटे यांच्यासह राजीक खान, मधुकर साखरे, रूपचंद जांभुळकर, जैपाल प्रधान, नरेश राऊत, सचिन मेळे, कैलाश घासले, कालीराम किरसान आदिंसह शेतकरी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या नियमानुसार प्रदूषित पाणी नदी नाल्यात सोडू नये, हा नियम असताना सुद्धा कंपनीकडून नियमांना वेशीवर टांगून कामकाज केले जात आहे. सतत रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याने परिसरातील पाणी दुषित होवून पिकांवरही परिणाम होत आहे. या संदर्भात वारंवार सूचना करून सुद्धा कंपनीकडून आडमुठेपणाची भूमिका घेतली जात आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आगामी काळात रसायनयुक्त पाणी सोडणे बंद झाले नाही तर कंपनीविरोधात आंदोलन करणार, असा इशारा भागी, गोटाबोडीसह परिसरातील गावकर्यांनी निवेदनातून दिला आहे.