मुंबईनंतर विदर्भातही ठाकरे ब्रँड!नागपूरसह चार महापालिकांत युती निश्चित

    दिनांक :18-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Thackeray brand in Vidarbha राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात हालचालींना वेग आला असतानाच ठाकरे बंधूंच्या युतीबाबत एक मोठी आणि निर्णायक बातमी समोर आली आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकनंतर आता विदर्भातील आणखी चार महापालिकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उबाठा) आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या चारही महापालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे आता शिवसेना–मनसेची युती एकूण आठ जिल्ह्यांतील महापालिकांमध्ये होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ठाकरे ब्रँड’ सक्रिय होत असल्याचे चित्र दिसत आहे.
 
 
 

thakre raj and uddhav 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी याबाबत माहिती देताना विदर्भातील चारही महापालिकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह मनसे एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. विदर्भात ठाकरे ब्रँड एकत्र येत असून त्याचा सकारात्मक परिणाम निवडणुकांमध्ये दिसेल आणि मोठे यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अकोला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू उंबरकर हे सध्या अकोला जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. याच बैठकीत इच्छुक नगरसेवक उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. यावरून विदर्भात शिवसेना–मनसे युतीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे.
आधीच मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यात आता विदर्भातील चार महापालिकांची भर पडल्याने राज्याच्या राजकारणात ही युती अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपूरसारख्या शहरात या युतीचा काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना–मनसे युतीचा वाढता विस्तार राज्यातील राजकीय समीकरणे बदलणारा ठरतो का, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.