वॉशिंग्टन,
The possibility of nuclear war रशिया–युक्रेन युद्धाला तीन वर्षे उलटून गेली असतानाच जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे का, अशी भीती व्यक्त केली जात आहे. उद्योगपती आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी दिलेल्या गंभीर इशाऱ्यामुळे जागतिक पातळीवर चिंता वाढली आहे. दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बमुळे बेचिराख झालेल्या जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकीच्या जखमा अजूनही भरल्या नसताना, पुन्हा अण्वस्त्र युद्धाची शक्यता मांडली जात असल्याने जगभरात अस्वस्थता पसरली आहे.
एलॉन मस्क यांनी इशारा देताना सांगितले की येत्या पाच ते दहा वर्षांत मोठे जागतिक युद्ध होण्याची शक्यता आहे. या संभाव्य युद्धात अण्वस्त्रांचा वापर होऊ शकतो आणि सर्व बाजूंनी अणुहल्ले होणारे हे पहिलेच युद्ध ठरू शकते. अण्वस्त्र प्रतिबंधक क्षमता अपयशी ठरण्याचीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे. मस्क यांच्या या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, शांततेची भाषा करणारे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही रशिया–युक्रेन युद्ध तिसऱ्या महायुद्धाचे कारण ठरू शकते, असा इशारा दिला आहे. नाटोच्या नेतृत्वानेही रशियाकडून वाढत्या धोक्याबाबत चिंता व्यक्त करत युरोप थेट लक्ष्यावर असल्याची भीती मांडली आहे. त्यामुळे युरोपीय देशांना युद्धासाठी सज्ज राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
युक्रेनने अद्याप अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नसल्याने युद्ध अधिक चिघळत आहे. आतापर्यंत या संघर्षात लाखो नागरिक आणि २५ हजारांहून अधिक सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. त्यातच अलीकडे रशियाने युक्रेनमधील विविध इमारतींवर ४५० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केल्याने विध्वंस आणखी वाढला आहे. हा संघर्ष असाच वाढत राहिला आणि त्यात अमेरिका तसेच युरोप थेट उतरले, तर जग दोन गटांत विभागले जाऊन तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. अण्वस्त्रांच्या संभाव्य वापरामुळे पृथ्वीवरील मानवी अस्तित्वच धोक्यात येईल, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.