कलाकृतीचा प्रवास जाणिवेतून नेणिवेकडे जाणारा असावा : रवींद्र इंगळे चावरेकर

    दिनांक :18-Dec-2025
Total Views |
बुलढाणा,
Ravindra Ingle Chavrekar नेपथ्यापासून ते प्रकाशयोजना, संगीत, रंग व वेशभूषा अशा विविध कलांचा आधार घेऊन सादर केली जाणारी नाट्यकला ही अत्यंत जोखमीची बाब आहे. म्हणूनच नाट्य सादरीकरण हे एक आव्हान म्हणून स्वीकारावे लागते. यातून ज्या कलाकृतीचा प्रवास हा जाणिवेतून नेणिवेकडे जाणारा असतो, ती कलाकृती व त्यातील विचार चिरंतर टिकणारे असतात, असे मत संशोधक साहित्यिक तथा नाटककार रवींद्र इंगळे चावरेकर यांनी येथे व्यक्त केले.
 

Ravindra Ingle Chavrekar 
माणुसकी मल्टीपर्पज फाऊंडेशनच्यावतीने समर्थ एज्युकेशनच्या सभागृहात १७ सप्टेंबरला आयोजित नाट्यसंवाद व सत्कार समारंभात प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध उर्दू गझलकार डॉ. गणेश गायकवाड हे होते. इंजि. गणेश बंगाळे व नाट्यकर्मी शशिकांत इंगळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्याहस्ते नटराज पूजन करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय सोनोने, आनंद संचेती, लक्ष्मीकांत गोंदकर व पराग काचकुरे यांनी उपस्थितांचे सन्मानचिन्ह व पुष्प देऊन स्वागत केले. मुंबईच्या मराठा मंदिर या संस्थेतर्फे स्पर्धात्मक स्वरुपातील साहित्य पुरस्कार स्पर्धेत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाचे विजेते ठरल्याबद्दल मी काहीही विसरलेलो नाही या नाट्यपुस्तकाचे लेखक शशिकांत इंगळे व राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत अकोला केंद्रावरुन प्रथम आलेल्या ’डोळा नसलेला अर्जुन’ या नाटकाच्या संपूर्ण संघाचा माणुसकी फाऊंडेशनतर्फे मान्यवरांच्याहस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नामदेव पायरीतील कलावंतांना मुख्यमंत्री चषकाचे व अटल करंडक स्पर्धेत विजेते ठरल्याबद्दलच्या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना रवींद्र इंगळे चावरेकर यांनी सत्ता, व्यवस्था व कला आणि पुरस्कार याविषयाच्या अनुषंगाने विचार व्यक्त करीत श्रोत्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यक्रमाला जेष्ठ साहित्यिक सुरेश साबळे, सारंग महाजन, अरविंद पवार, विनय शुल, योगेश बांगडभट्टी, तुषार काचकुरे, जयंत दलाल, आनंद संचेती, पंजाबराव आखाडे, प्रा. डॉ. स्वप्नील दांदडे, प्रा . शैलेश वारे, संतोष पाटील, गणेश राणे, विलास मानवतकर, विकी चव्हाण, शुभम सोरमारे, धनंजय बोरकर, डॉ. जयेश चौधरी, अभिलाष चौबे, भारती बर्‍हाटे, गुड्डू सय्यद, सचिन अवसरमोल, बाल कलावंत सार्थक बर्‍हाटे यांच्यासह नाट्यकर्मी बहुसंख्येने उपस्थित होते.