तभा वृत्तसेवा
महागाव,
sand-smugglers-attack-police-officers : वाळू तस्करी करणाèया ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या सहायक पोलिस निरीक्षकांवर वाळू तस्करांनी प्राणघातक हल्ला केला. पोलिस अधिकाèयाने आपल्या बचावासाठी गोळीबार केला. यात एक हल्लेखोर जखमी झाल्याची घटना वाडी (वाकोडी) येथे गुरुवार, 18 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास घडली.
महागाव तालुक्यातील वाडी (वाकोडी) शिवारात पूस नदीपात्रात अवैध वाळू उपसा करून चोरी होत असल्याची माहिती महागाव पोलिस निरीक्षक सुनील अंबुरे यांना मिळाली. त्यावरून अंबुरे यांनी गुरुवार, 18 डिसेंबर रोजी सकाळी 10.30च्या सुमारास घटनास्थळी पाहणी केली. त्यांना काही इसम अवैध वाळू उपसा करून ट्रॅक्टरद्वारे भरून नेत असल्याचे आढळले. त्यांनी त्या इसमांना विचारपूस करीत असताना पाच-सहा वाळू तस्करांनी ‘आमचे ट्रॅक्टर पकडून आमच्यावर का कारवाई करता’ असे म्हणून अचानक हल्ला केला.
या हल्ल्यामुळे गोंधळून गेलेल्या अंबुरे यांनी आपल्या स्वसंरक्षणासाठी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून दोन राऊंड फायर केले. यात हल्लेखोरांपैकी गुलाब खाजा शेख याच्या खांद्याला गोळी लागल्याने तो जखमी झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात सहायक पोलिस निरीक्षक सुनील अंबुरे जखमी झाल्याने त्यांना सवना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला. या घटनेची माहिती महागाव पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत फरार आरोपींचा शोध घेत यातील दोन आरोपींना पकडले. तीन आरोपी फरार असल्याची माहिती असून या घटनेमुळे वाडी (वाकोडी) मध्ये तणावसदृश्य स्थिती निर्माण झाली.
घटनेनंतर महागावचे तहसीलदार अभय मस्के, ठाणेदार धनराज निळे, उमरखेडचे ठाणेदार शंकर पांचाळ, दंगल नियंत्रण पथकाने गावात पोहचून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
पोलिस अधीक्षकांची घटनास्थळी भेट
वाळूमाफियांनी सहायक पोलिस निरीक्षकांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करून घटनास्थळावरून ट्रॅक्टरसह पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बीजे, स्थागुशाचे पोलिस निरीक्षक सतीश चवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जखमी सहायक पोलिस निरीक्षक सुनील अंबुरे यांची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस करून फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना दिल्या.