कॅरोलिना,
A plane crashed in America. अमेरिकेत पुन्हा एकदा भीषण विमान दुर्घटना घडली असून या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर कॅरोलिना राज्यातील स्टेट्सविले प्रादेशिक विमानतळावर उतरत असताना एक खासगी व्यावसायिक जेट कोसळले आणि काही क्षणांतच आगीत भस्मसात झाले. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेस्ना C550 प्रकारच्या या विमानात पायलटसह एकूण सात जण होते. हे विमान चार्लोट शहराच्या उत्तरेस सुमारे ७२ किलोमीटर अंतरावर असलेल्या स्टेट्सविले विमानतळावर लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना दुर्घटनाग्रस्त झाले. अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली, ज्यामुळे बचावकार्य करणे कठीण झाले.

इरेडेल काउंटीचे शेरीफ डॅरेन कॅम्पबेल यांनी या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी केली आहे, मात्र मृतांचा अचूक आकडा अद्याप स्पष्ट करण्यात आलेला नाही. उड्डाण नोंदींनुसार, हे विमान निवृत्त NASCAR चालक ग्रेग बिफल चालवत होते, अशी माहिती समोर आली आहे. स्टेट्सविले प्रादेशिक विमानतळाचा वापर प्रामुख्याने NASCAR संघ आणि काही मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून केला जातो. त्यामुळे या दुर्घटनेची गंभीर दखल घेण्यात येत आहे.
अपघाताच्या वेळी विमानतळाजवळील लेकवुड गोल्फ क्लबमध्ये काही जण गोल्फ खेळत होते. त्यांच्या डोळ्यांसमोरच हे विमान अत्यंत कमी उंचीवरून जात असल्याचे त्यांनी पाहिले. काही क्षणांतच ते जमिनीवर आदळले. प्रत्यक्षदर्शी जोशुआ ग्रीन यांनी सांगितले की, विमान खूपच खाली येत असल्याचे पाहून सगळेच हादरले होते आणि दृश्य अत्यंत भयावह होते. AccuWeather च्या माहितीनुसार, त्या वेळी परिसरात पाऊस पडत होता आणि वातावरण ढगाळ होते, ज्याचा उड्डाणावर परिणाम झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ट्रॅकिंग माहितीनुसार, विमानाने सकाळी दहा वाजल्यानंतर उड्डाण केले होते. काही वेळानंतर ते पुन्हा विमानतळाकडे वळले आणि लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना अपघात झाला. या विमानाचा नियोजित प्रवास फ्लोरिडातील सारासोटा येथून बहामासमधील ट्रेझर के आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत आणि त्यानंतर फोर्ट लॉडरडेलमार्गे संध्याकाळी स्टेट्सविले येथे पोहोचण्याचा होता.