आधार नोंदणीला गती द्या : जिल्हाधिकारी कुंभेजकर

    दिनांक :19-Dec-2025
Total Views |
वाशीम,
Aadhaar registration drive, आधार हे शासनाच्या सर्व योजनांचे मुख्य दुवे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकही नागरिक आधारपासून वंचित राहू नये. नवजात बालकांपासून वृद्ध, दिव्यांग, बेघर व हरविलेल्या बालकांपर्यंत सर्वांचा आधार नोंदणीत समावेश करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे. आधार नोंदणी कॅम्पची प्रभावी प्रचार-प्रसिद्धी करून गरजूंना तात्काळ लाभ मिळेल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यंत्रणांना दिले.
 

Aadhaar registration drive, 
जिल्ह्यातील आधार नोंदणी प्रक्रियेचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय आढावा बैठक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला महिला व बालकल्याण कार्यक्रमाधिकारी संजय जोल्हे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उत्तम शिंदे, गृह विभागाचे पोलिस उपअधीक्षक धर्मा सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यशवीर कुमार, जिल्हा प्रकल्प प्रमुख सौरभ जैन,जिल्हा प्रकल्प अधिकारी राहुल काकड आदी उपस्थित होते
बैठकीत जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक शाळेत आधार नोंदणीसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश दिले. शालेय स्तरावर एमबीयु १ व एमबीयु २ प्रक्रिया राबविण्यात यावी. दरमहा सुमारे १० हजार आधार नोंदणीचे उद्दिष्ट ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यावर भर देण्यात आला. विशेषतः नवजात बालकांचे आधारकार्ड तात्काळ काढून दैनंदिन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. यासोबतच सर्व प्रक्रियेचे एनसीईआर सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
महिला व बालविकास व बालकल्याण विभागाने मिशन वात्सल्य अंतर्गत हरविलेली बालके, १८ वर्षांवरील बेघर नागरिक तसेच दिव्यांग व्यक्ती यांच्या आधार नोंदणीबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या ८३ आधार किट्स पूर्णपणे कार्यान्वित आहेत का, याचा आढावा घेत त्यांच्या प्रभावी वापरावर भर देण्यात द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी दिले.आरोग्य विभागाने दररोज जन्म नोंदणी होईल याकडे विशेष लक्ष द्यावे, तसेच रुग्णालय स्तरावर आवश्यक त्या सर्व आधार नोंदणीसाठी प्रक्रिया तात्काळ कार्यान्वित ठेवाव्यात, असे निर्देशही देण्यात आले. बैठकीत रेसीडेन्स ग्रिव्हीएन्स आणि तृतीय पंथीयांच्या आधार बाबतही सविस्तर चर्चा झाली. बैठकीला शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, डाक विभाग, आयपीपीबी, सर्व तहसीलदार तसेच यूआयडीएचे प्रतिनिधी उपस्थित होते. माहितीचे सादरीकरण युआयडीएचे विभागीय कोऑरडिनेटर महेश शिंदे यांनी केले.