अमरावती,
amravati-news : अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर उबाठा शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अमरावती महापालिकेत सलग पाच वेळा नगरसेवक राहिलेले, विरोधी पक्षनेते तसेच उबाठाचे जिल्हाप्रमुख प्रशांत वानखडे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह युवा स्वाभिमान पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. हा प्रवेश सोहळा युवा स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष आमदार रवि राणा यांच्या उपस्थितीत पार पडला.
या वेळी आमदार रवि राणा यांनी प्रशांत वानखडे यांच्यासह ९०० प्रवेश घेणार्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आणि युवा स्वाभिमान पार्टीचा दुपट्टा घालून सन्मानपूर्वक स्वागत केले. यावेळी बोलताना प्रशांत वानखडे म्हणाले की, आमदार रवि राणा यांचे अमरावतीसाठी केलेले विकासकार्य, त्यांची स्पष्ट भूमिका आणि लोकाभिमुख विचारधारा पाहून मी युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उबाठा पक्ष सध्या नेतृत्वहीन झाला असून कार्यकर्त्यांमध्ये दिशाहीनता निर्माण झाली आहे. आमदार रवि राणा यांनी या प्रवेशाचे स्वागत करताना सांगितले की, प्रशांत वानखडे यांचा प्रदीर्घ अनुभव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची ताकद युवा स्वाभिमान पार्टीला निश्चितच बळ देईल. आगामी महापालिका निवडणुकीत युवा स्वाभिमान पार्टी अमरावतीत निर्णायक भूमिका बजावेल.
या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी महापालिका निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी सुनील राणा, शैलेंद्र कस्तुरे, जयंत वानखडे, संजय हिंगासपुरे, ज्योती सैरिसे, सोनाली नवले, नंदा सावदे, महेश मुलचंदानी, अनुप अग्रवाल, सचिन भेंडे, सारिका म्हाला, अर्चना तालन, सुरेश पडोळे, अशोक भागडकर, राजेश बोरेकर, दत्तात्रय भाडकर, विशाल बोबडे, केतन मसतकर, धनंजय बोबडे, विनोद मामुरकर, उमेश किरणापुरे, रमेश कनपटे, कांचन कडू, साक्षी उमक, राजा बाखडे, उमेश ढोणे, कुशल बोबडे, राजेश शिरभाते आदी उपस्थित होते.