अमरावती,
the-shortest-day-of-the-year : २१ डिसेंबर रोजी सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे राहील. या बिंदूला विंटर सोल्स्टाईस असे म्हणतात. या बिंदूवर सूर्य असतांना दिवस हा वर्षातला सर्वात लहान दिवस व रात्र ही सर्वात मोठी असते. २१ डिसेंबरचा दिवस हा १० तास ४७ मिनिटांचा राहील. या दिवसात दरवर्षाला एक दिवसाचा फरक पडू शकतो.

दिवस व रात्रीचा कालावधी कमीजास्त होणे आपण नेहमीच अनुभवत असतो. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कललेला असल्याने हे घडत असते. याचाच परिणाम म्हणून सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायण सुद्धा आपल्याला अनुभवता येते. कोणत्याही वस्तूच्या पडणार्या सावलीचे निरीक्षण केल्यास सूर्याचे दक्षिणायण व उत्तरायण सहज लक्षात येऊ शकते. पृथ्वीवरील ऋतू सुध्दा पृथ्वीच्या अक्षाच्या कलत्या स्थितीमुळे निर्माण होतात. आकाशात वैषुविक आणि आयनिक वृत्ताचे दोन काल्पनिक छेदन बिंदू आहेत. यापैकी एका बिंदूत २२ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो याला ‘वसंत संपात बिंदू’ असे म्हणतात. तर त्याचे विरुद्ध बिंदूत २३ सप्टेंबर रोजी सूर्य प्रवेश करतो याला ‘शरद संपात बिंदू’ असे म्हणतात. या दोन्ही दिवशी रात्रीचा व दिवसाचा कालावधी हा सारखाच असतो. २१ डिसेंबर रोजी सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूवर सूर्य असतांना दिवस हा वर्षातला सर्वात लहान दिवस व रात्र ही सर्वात मोठी असते. या दिवसाला ‘हिवाळा अयन दिवस’ असे सुद्ध म्हणतात.
सर्व खगोल प्रेमींनी व जिज्ञासूंनी २१ डिसेंबर या सर्वात लहान दिवसाचे प्रत्यक्ष कालमापन करावे व या १० तास ४७ मिनिटांच्या सर्वात लहान दिवसाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व एस. आर.पी. कॅम्प, अमरावती स्थित हौशी खगोल अभ्यासक विजय म. गिरुळकर यांनी केले आहे.