भरदिवसा युवकाची निर्घृण हत्या

-घटनेनंतर चार आरोपी पसार -बोरनदी धरणावरची घटना

    दिनांक :19-Dec-2025
Total Views |
नांदगाव पेठ, 
murder-case : वाळकी रोडस्थित बोरनदी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी दुपारी सुमारे ३.३० वाजताच्या सुमारास चार हल्लेखोरांनी मिळून धारदार शस्त्राने सपासप वार करत एका युवकाची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हत्या झालेल्या युवकाचे नाव मन्या उर्फ मंथन रवींद्र पाळनकर (१७, रा. शिलांगण रोड, सातूर्णा) असे आहे. मन्या उर्फ मंथन हा काही महिन्यांपूर्वी अमरावतीत झालेल्या यश रोडगे हत्याकांडातील आरोपी असल्याचे समजते.
 
AMT 
 
 
आठ दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने मंथनला एका प्रकरणात अटक केली होती. त्यांनतर तो जमानतवर बाहेर आला होता. शुक्रवारी सकाळी घटनेतील एका आरोपीने मंथनला मॅसेज करून वाळकी रोडवर बोलावले होते. मंथन साडेतीन वाजताच्या दरम्यान विना नंबरप्लेटच्या स्पोर्ट बाईकने बोरनदी प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहचला आणि काही समजण्याच्या आतच चार जणांनी घेरून त्याच्या मानेवर, हातावर आणि पोटावर चाकूने वार केले. मंथन रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळी पडलेला असताना रस्त्याने जाणार्‍या नागरिकांनी घटनेची माहिती नांदगाव पेठ पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी पोहचली होती. परिसराची नाकाबंदी करून पंचनामा सुरू करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, मृतक मंथन हा काही दिवसांपूर्वी घडलेल्या यश रोडगे हत्याकांडातील आरोपी असल्याचे समोर आले आहे.
 
 
त्या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशानेच मंथनची हत्या करण्यात आल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू होती. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली असून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती व प्रत्यक्षदर्शींच्या आधारे तपास वेगात सुरू आहे. मंथन ज्या वाहनाने घटनास्थळी आला होता त्या वाहनाच्या आधारे मालकाची माहिती घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे ठाणेदार दिनेश दहातोंडे यांनी सांगितले.
 
 
प्रवेशद्वारावर हत्या, धरणावर रासलीला
 
 
बोरनदी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर मंथनची हत्या होऊन परिसरात पोलिस छावणी उभी राहिली असतानाच धरण परिसरात ४ ते ५ अल्पवयीन जोडप्यांची रासलीला सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत सर्वांना हुसकावून लावून समज दिली. हा परिसर अनैतिक कृत्यांचा अड्डा बनत असून दररोज शेकडो प्रेमीयुगल येथे येतात, त्यामुळे अनेक अनुचित घटना घडत असल्याचे वास्तव समोर येत आहे. या परिसरात कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त व कडक कारवाईची गरज व्यक्त होत आहे.