ढाका,
burn journalists alive in Bangladesh बांगलादेशमध्ये युवा नेते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येनंतर हिंसाचाराची लाट उफाळली आहे. ढाका आणि इतर मोठ्या शहरांमध्ये संतप्त जमावाने अनेक वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर हल्ला केला, तोडफोड केली आणि आग लावली. या हिंसाचारामुळे देशात राष्ट्रीय निवडणुकीपूर्वी गंभीर अशांतता निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हादी यांना शुक्रवारी ढाक्यातील निवडणूक प्रचारादरम्यान मुखवटा घाललेल्या हल्लेखोरांनी गोळी झाडली होती. गंभीर जखमी झालेल्या हादींना सिंगापूरला प्रगत उपचारांसाठी नेण्यात आले, जिथे सहा दिवस लाईफ सपोर्टवर राहिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

हादींच्या मृत्यूनंतर ढाका आणि इतर शहरांमध्ये इन्कलाब मंचचे समर्थक रस्त्यावर उतरले. त्यांनी पहिले हल्ले बंगाली भाषेतील ‘प्रथम आलो’ या वृत्तपत्राच्या कार्यालयावर केले, जिथे जमावाने मध्यरात्री घोषणाबाजी करत प्रवेश केला. पत्रकारांनी आणि कर्मचार्यांनी आगीपासून वाचण्यासाठी चार तासांहून अधिक काळ संघर्ष केला. डेली स्टारच्या कार्यालयावरही हल्ला करण्यात आला. शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कमीतकमी २५ पत्रकारांना जळत्या इमारतीतून सुरक्षित बाहेर काढले गेले. हल्लेखोरांनी प्रथम मजल्यावर आणि जमिनीवर तोडफोड केली आणि नंतर इमारतीला आग लावली. आगीने दोन मजले वेगाने झपाट्याने वेढले आणि परिसरात धुराचे लोट पसरले. या हिंसाचारामुळे बांगलादेशमध्ये पत्रकारितेवरही धोका निर्माण झाला असून प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.