वेबसाईट स्लोमुळे CTET फॉर्मभरताना गोंधळ

    दिनांक :19-Dec-2025
Total Views |
नागपूर,
CTET form संपूर्ण भारतातील शिक्षकांसाठी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे दरवर्षी दोनदा आयोजित केली जाते. मात्र, मागील वर्षी ही परीक्षा फक्त एकदाच घेण्यात आली. पुढील परीक्षा ८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे, आणि त्यासाठी फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस १८ डिसेंबर २०२५ होती. देशभरातील शिक्षक आणि भावी शिक्षकांनी या शेवटच्या दिवशी ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात केली, परंतु वेबसाईट खूप स्लो असल्यामुळे अनेकांना फॉर्म भरता आले नाही. अनेक शिक्षकांनी या संदर्भात फोन आणि ईमेलद्वारे संपर्क साधला, परंतु केंद्रीय माध्यमिक शिक्षण विभागाकडून अद्याप काही प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे अंदाजे ५ ते १० हजार शिक्षकांना या परीक्षेत प्रवेश घेता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
CTET
 
सुप्रीम कोर्टाने २ सप्टेंबर २०२५ रोजी सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा पास करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे ही परीक्षा खूप महत्त्वाची मानली जाते. परंतु फॉर्म भरण्यात अडचणीमुळे शिक्षकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काही शिक्षकांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण विभागाला ईमेलद्वारे निवेदन पाठवून फॉर्म भरण्यासाठी एक दिवस वाढवण्याची विनंती केली आहे. CTET form अनेकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेवटच्या दिवशी एका फॉर्मसाठी सुमारे ७ ते ८ तास लागले, तरीही फॉर्म पूर्ण झाला नाही. केंद्र सरकारकडे उच्च दर्जाचे तंत्रज्ञान असूनही या अडचणींमुळे शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
सौजन्य: अंशुल जिचकार, संपर्क मित्र