देवळी,
municipal-council-election : नगरपरिषद निवडणूक स्थगितीनंतर वर्धा जिल्ह्याचे लक्ष देवळीतील निवडणुकीकडे लागले होते. मतदानाच्या अवघ्या काही तास आधी प्रचार शिगेला पोहोचला असून देवळीतील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे. शेवटच्या दिवशी झालेल्या रॅली, रोड शो, सभा आणि शक्तीप्रदर्शनामुळे आजचा दिवस ढवळून निघाला.
भाजपाने या निवडणुकीत संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजय संकल्प सभेमुळे प्रचाराला निर्णायक वळण मिळाल्याचे चित्र आहे. या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून संघटनात्मक ताकद दिसून आली. माजी खासदार नवनीत राणा यांचा रोड शो व सभा म्हणजे भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे स्पष्ट संकेत आहेत. काँग्रेसने माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री रणजित कांबळे, खा. अमर काळे, वसंत पुरके या नेत्यांच्या सभा घेऊन पारंपरिक काँग्रेस मतदारांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला.
जनशती आघाडीने या निवडणुकीत रॅली व दारोदार प्रचार केला असून माजी मंत्री बच्चू कडू आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या देवळी शहरात सभा घेऊन मतदारांना निवडून देण्याचे आवाहन केले. विशेष बाब म्हणजे मतदारांचा सायलेंट मोड. प्रचारात प्रचंड गदारोळ असला तरी मतदार खुलेपणाने भूमिका मांडताना दिसत नाही. देवळी नगरपरिषद निवडणूक ही आता केवळ स्थानिक निवडणूक राहिलेली नसून ती प्रतिष्ठेची नेतृत्वाची आणि भविष्यातील राजकीय दिशा ठरवणारी लढत बनली आहे.