काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे!

फडणवीसांचा चव्हाणवर हल्लाबोल

    दिनांक :19-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Fadnavis attacks Chavan महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा जोरदार शाब्दिक संघर्ष पाहायला मिळत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. चव्हाण यांचे नाव थेट न घेता फडणवीस यांनी काही नेत्यांच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त करत “काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असा घणाघाती हल्ला चढवला.
 
 

hindustan 
देवळी येथे झालेल्या एका जाहीर सभेत बोलताना फडणवीस म्हणाले की, सध्या काही राजकीय नेते आणि पक्ष नेमके काय बोलत आहेत, हेच समजत नाही. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या एका नेत्याने मुलाखतीत ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागल्याचा दावा केला होता. त्या नेत्याने भारतीय लढाऊ विमानांचे नुकसान झाल्याचे सांगत सैन्याची ताकद कमी करण्याची गरज असल्याचेही विधान केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. फडणवीस यांच्या मते, अशा प्रकारची वक्तव्ये करणाऱ्यांनी आपले मानसिक संतुलन गमावले असून अशा लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य आहे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी, म्हणजे ७ मे रोजी पाकिस्तानशी झालेल्या हवाई संघर्षात भारताचा “पूर्ण पराभव” झाल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यामुळे भाजपकडून चव्हाण यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले असून त्यांच्या विधानाला देशविरोधी ठरवण्यात आले आहे. भाजपने गुरुवारी काँग्रेस नेतृत्वाकडे थेट मागणी करत म्हटले की, चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे भारतीय लष्कराचा अपमान झाला असून याबाबत काँग्रेसने अधिकृत माफी मागितली पाहिजे. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी पत्रकार परिषदेत चव्हाण यांच्या विधानाचा तीव्र निषेध करत ते राष्ट्रविरोधी असल्याचे सांगितले.
दरम्यान, या टीकेला न जुमानता पृथ्वीराज चव्हाण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. बुधवारी त्यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी झालेल्या हवाई संघर्षाबाबत केलेल्या विधानावर ते कायम आहेत. एप्रिलमध्ये जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईवर त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबतही ते माफी मागणार नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर, ऑपरेशन सिंदूर आणि त्यावरून सुरू झालेला हा वाद महाराष्ट्राच्या राजकारणात अधिकच तापला असून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.