नागपूर,
Dindayal Nagar दिनदयालनगर प्रभात शाखेच्या पारिवारिक सहलीचे आयोजन अंभोर्याला करण्यात आले. ठरल्याप्रमाणे, सकाळी १० वाजता जेष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या दोन ग्रीन बसमध्ये नागपूरहून प्रवास सुरू झाला. या सहलीत एकूण ७० लोकांचा सहभाग होता. अतिशय आनंद आणि उत्साहाने सहलीला सुरवात झाली. बसमध्ये गप्पा, गाणी आणि खेळ यामध्ये वेळ कसा गेला, कळलंच नाही. पोचल्यावर चहा आणि बिस्कीटचा आस्वाद घेतला. नंतर चैतन्येश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी जवळपास १०० पायऱ्या चढून सर्व जेष्ठ नागरिक मंदिरात गेले.

हा परिसर अत्यंत रमणीय आहे आणि पाच नद्यांच्या संगमावर असलेले मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. भक्तिभावाने दर्शन घेण्यात आले; कोणी रुद्राध्याय केला तर कोणी मनोभावे स्तोत्र पठण केले. खाली उतरल्यावर स्वादिष्ट भोजनाची सोय होती. Dindayal Nagar भोजनोत्तर काही मनोरंजक कार्यक्रम, प्रश्नमंजुषा आणि परिसंवाद असे उपक्रम घेतले गेले. संध्याकाळी ६:०० वाजता अंभोरा स्काय वॉकसाठी निघालो. लिफ्टने १५व्या मजल्यावरून दिसणारा अतिशय सुंदर नजारा पाहून सर्वांचा भान हरवले. खाली दिसणारा पंचनद्यांचा संगम, आजूबाजूला पसरलेले डोंगर आणि मावळतीच्या सूर्यकिरणांची उधळण अत्यंत मनोहारी होती. थोड्याच वेळात रोषणाई झाली आणि अंभोर्याच्या सौंदर्यात अधिकच भर पडली.सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला आणि भरपूर ऊर्जा घेऊन परतीचा प्रवास सुरू झाला. ही सहल सर्वांसाठी खूपच अविस्मरणीय ठरली.
सौजन्य: वर्षा देशपांडे, संपर्क मित्र