नवी दिल्ली,
Flights cancelled to Delhi दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागांत दाट धुके आणि अत्यंत कमी दृश्यमानतेमुळे विमान वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक मंत्रालयासह एअर इंडिया, इंडिगो आणि इतर विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी प्रवास सूचना जारी केल्या आहेत. हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे उड्डाणांना विलंब होण्यासह काही उड्डाणे रद्द होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनानेही प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, आपल्या संबंधित विमान कंपनीशी सतत संपर्कात राहण्याचा सल्ला दिला आहे. अधिकृत प्लॅटफॉर्मवरून उड्डाणांची स्थिती तपासावी आणि प्रवासासाठी अतिरिक्त वेळ राखून ठेवावा, असे सांगण्यात आले आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी विमानतळावर विशेष सुविधा पथके तैनात करण्यात आली आहेत.

दरम्यान, शुक्रवारी स्पाइसजेटची दिल्लीहून अहमदाबादला जाणारी एक उड्डाण रद्द करण्यात आल्याने विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्पाइसजेटने खराब हवामानामुळे ही उड्डाण रद्द करावी लागल्याचे स्पष्ट केले. १८ डिसेंबर रोजीची एसजी ८१९३ ही उड्डाणे दिल्लीतील हवामानामुळे रद्द करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आणि प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पर्यायी उड्डाण पुन्हा बुक करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र, दिल्लीतील टर्मिनल ३ वर प्रवाशांचा संताप पाहायला मिळाला. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, रात्री १० वाजताची असलेली उड्डाणे आधी पहाटे २ वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर प्रवाशांना दोन तास विमानातच बसवून ठेवण्यात आले आणि अखेर पहाटे ४ वाजता उड्डाण रद्द करण्यात आली. पर्यायी व्यवस्था किंवा राहण्याची कोणतीही मदत देण्यात आली नाही, तसेच परतफेड कधी मिळणार याबाबतही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही, असा आरोप प्रवाशांनी केला.
एअर इंडियाने गुरुवारीच इशारा देत सांगितले होते की, हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारी दिल्ली तसेच उत्तर आणि पूर्व भारतातील काही भागांत दाट धुके राहणार असून याचा विमान सेवांवर परिणाम होऊ शकतो. दाट धुक्यामुळे संपूर्ण उड्डाण नेटवर्कवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही एअर इंडियाने स्पष्ट केले. ‘एक्स’वरील सल्लागारात कंपनीने व्यत्यय कमी करण्यासाठी आधीच उपाययोजना केल्याचे सांगितले आहे. विलंब किंवा रद्दीकरणाच्या परिस्थितीत ग्राउंड स्टाफ प्रवाशांना मदत करेल आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. काही उड्डाणांवरील प्रवाशांना आगाऊ सूचना देण्यात येणार असून, त्यांना अतिरिक्त शुल्काशिवाय फ्लाइट बदलण्याचा किंवा पूर्ण परतफेडीचा पर्याय दिला जाणार आहे. प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी उड्डाणाची स्थिती तपासावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. इंडिगो एअरलाइन्सनेही शुक्रवारी सकाळी उत्तर भारतात पसरलेल्या दाट धुक्याचा हवाला देत प्रवास सल्ला जारी केला. सकाळी लवकर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विलंब किंवा वेळापत्रकात बदलाचा सामना करावा लागू शकतो, असे इंडिगोने सांगितले. हवामान परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून, गैरसोय कमी करण्यासाठी हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेशी समन्वय साधला जात असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले.