वर्धा,
Ganja sellers : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिंगणघाट येथील संत ज्ञानेश्वर वॉर्डात कारवाई करून गांजाची विक्री करणार्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५१४ ग्रॅम गांजासह १ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने गोपनीय माहितीच्या आधारे १८ रोजी धडक कारवाई केली. पोलिसांच्या पथकाने हिंगणघाट येथील संत ज्ञानेश्वर वॉर्ड परिसरातील संतोषी माता मंदिर जवळ निशांत रिठेकर रा. संत ज्ञानेश्वर वॉर्ड व त्याचा अल्पवयीन साथीदार असे दोघांना ताब्यात घेतले. त्याची पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याजवळ गांजा आढळून आला. गांजा एम. एच. ४० बी. झेड. ८६१६ क्रमांकाच्या दुचाकीने नागपूर येथे जात कमाल चौक येथील विनायक नामक व्यतीकडून खरेदी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी गांजा, दुचाकी, मोबाईल असा १ लाख ७५ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवी पुरोहित, अक्षय राऊत, अभिषेक नाईक यांनी केली.