हादी हत्येने बांगलादेश पुन्हा पेटला, राजधानी ढाक्यात हिंसक आंदोलन

    दिनांक :19-Dec-2025
Total Views |
ढाका,
Hadi's murder sparks violence in Bangladesh ढाक्यातून पुन्हा एकदा अस्थिरतेच्या बातम्या येत आहेत. तरुण विरोधी नेते उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशात तीव्र संताप उसळला असून राजधानी ढाक्यासह देशातील अनेक भागांत हिंसक निदर्शने सुरू झाली आहेत. गेल्या वर्षी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधातील आंदोलनांमध्ये आघाडीवर असलेले उस्मान हादी यांचे गुरुवारी सिंगापूरमध्ये निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच परिस्थिती हाताबाहेर गेली. हादी यांना गेल्या आठवड्यात मध्य ढाक्यातील बिजॉयनगर परिसरात निवडणूक प्रचार सुरू असताना मुखवटा घातलेल्या बंदूकधाऱ्यांनी डोक्यात गोळी मारली होती. ते १२ फेब्रुवारीला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवार होते. गंभीर जखमी अवस्थेत त्यांच्यावर ढाक्यात उपचार सुरू होते, मात्र प्रकृती अत्यंत नाजूक झाल्याने अंतरिम सरकारने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने सिंगापूरला हलवले. सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
 
 
usman hadi
 
 
हिंसाचारात २५ पत्रकारांची सुटका
बांगलादेशातील अनेक शहरांमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. राजधानी ढाकामध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनाही घडल्या आहेत. सिंगापूरच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशमध्ये हिंसाचार उसळला. बांगलादेशमधील हिंसाचाराच्या ताज्या अपडेट्ससाठी इंडिया टीमच्या डिजिटल टीमशी संपर्कात रहा. बांगलादेशमध्ये द डेली स्टारवर हिंसक हल्ल्यानंतर २५ पत्रकारांची सुटका. बीडी न्यूजच्या वृत्तानुसार, कावरन बाजार परिसरात द डेली स्टारच्या ढाका कार्यालयावर जमावाने हल्ला केल्यानंतर चार तासांहून अधिक काळ किमान २५ पत्रकारांची सुटका करण्यात आली. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर हल्लेखोरांनी इंग्रजी दैनिकाच्या कार्यालयावर हल्ला केला. इन्कलाब मंचचे नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर वाढत्या तणावादरम्यान बांगलादेशच्या राजशाहीमध्ये बुलडोझरने स्थानिक अवामी लीग कार्यालय उद्ध्वस्त करण्यात आले आहे.  
 
गुरुवारी रात्री उशिरा राष्ट्राला उद्देशून केलेल्या दूरचित्रवाणी भाषणात अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी हादी यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केली आणि दोषींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले. मात्र या घोषणेनंतरही रस्त्यांवरील संताप कमी झाला नाही. हादी यांच्या मृत्यूची बातमी कळताच इन्कलाब मंचचे कार्यकर्ते आणि समर्थक ढाका विद्यापीठ परिसरातील शाहबाग चौकात मोठ्या संख्येने जमा झाले. “तू कोण आहेस, मी कोण आहे – हादी, हादी?” अशा घोषणा देत जमाव अधिकच आक्रमक झाला. त्यानंतर कारवान बाजार परिसरातील प्रसिद्ध दैनिक ‘प्रथम आलो’च्या कार्यालयावर जमावाने हल्ला चढवला. इमारतीच्या अनेक मजल्यांची तोडफोड करण्यात आली, तर आत असलेले पत्रकार आणि कर्मचारी काही काळ अडकून पडले. जमावाने इमारतीला आग लावल्याने परिसरात मोठी दहशत पसरली. प्रत्यक्षदर्शींनुसार रात्री सुमारे अकराच्या सुमारास शेकडो निदर्शकांनी कार्यालयाला घेराव घातला होता.
 
या हिंसाचारादरम्यान एका व्यक्तीला मारहाण करून त्याला जाळण्यात आल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे, मात्र त्या व्यक्तीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. ‘प्रथम आलो’सोबतच ‘डेली स्टार’ या वृत्तपत्राच्या इमारतीवरही हल्ले झाल्याचे वृत्त आहे. ढाक्याबाहेरही देशाच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणावर हिंसक निदर्शने सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर अंतरिम सरकारने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती चिघळत असल्याने ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयानेही भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी सूचना जारी करत घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला असून आपत्कालीन मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. बांगलादेशात निर्माण झालेल्या या अस्थिरतेकडे संपूर्ण प्रदेशाचे लक्ष लागले आहे.