अपघातग्रस्त कुटुंबाच्या मदतीसाठी आधार प्रतिष्ठानची सामाजिक बांधिलकी

समाज माध्यमातून माणुसकीचे दर्शन

    दिनांक :19-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
हदगाव,
Help for accident victim family : बरडशेवाळा येथे सुतार कामगार म्हणून काम करणाèया नारायण विजय इंगोलकर यांचा तीन महिन्यांपूर्वी बामणीफाटा येथून बरडशेवाळाकडे येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघात झाला होता. तेव्हापासून ते रुग्णालयात भरती आहेत. त्यांच्या उपचारार्थ आधार प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेतला आहे.
 
 

y19Dec-Madat 
 
 
 
अपघातानंतर नारायण इंगोलकर यांना प्रथम बरडशेवाळा येथून नांदेड शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. तीन महिन्यांपासून आपत्कालीन विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
 
 
मात्र दररोज ड्रेसिंग, स्टोमा बॅग, बॅक्टेरिया रोल तसेच विविध मेडिकल साहित्य बाहेरून खरेदी करावे लागत आहे. त्यातच घरातील कर्ताच आजारी असल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पूर्णतः खालावली. पुढील आवश्यक शस्त्रक्रियेसाठी आर्थिक अडचणीमुळे कुटुंबाने मदतीचे आवाहन केले आहे.
 
 
या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ‘आधार प्रतिष्ठान’ हदगाव व ‘नाते माणुसकीचे’ ग्रुपच्या माध्यमातून मदत करण्यात आली. आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृती वानखेडे, सचिव गजानन अनंतवार यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक विलास चवळी, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी चंद्रशेखर गिरी, सामाजिक कार्यकर्ते राजू पांडे, प्रसाद चोंढीकर, सविता निमडगे, शिक्षक नारायण औटे, ग्रापं सदस्य वसंत चौधरी, सुभाष बापुराव नरोटे, सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक गणेश मस्के, दिनेश दहिभाते, प्रभाकर दहिभाते, अनिल उखळे व विवेक रावते यांनी आर्थिक व नैतिक मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
 
 
कुटुंबाच्या घरी भेट देऊन मदत करताना पुढील काळातही आवश्यक ती मदत करण्यात येईल, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृती वानखेडे, सचिव गजानन अनंतवार, सामाजिक कार्यकर्त्या सविता निमडगे, प्रभाकर दहिभाते यांच्यासह विकास मस्के व सुभाष नरोटे उपस्थित होते.