नाशिक,
Kokate's condition is stable नाशिकच्या सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृतीसंबंधी आज महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. मुंबईतील लीलावती रुग्णालयात कोकाटेंवर अँजिओग्राफी करण्यात आली असून, वैद्यकीय अहवाल या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाईसाठी निर्णायक ठरणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिक पोलिसांनी रुग्णालय प्रशासनाकडे अँजिओग्राफीसंदर्भातील सविस्तर वैद्यकीय अहवाल मागविला आहे. अहवालातून कोकाटेंची प्रकृती स्थिर असल्याचे आढळल्यास आजच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही तासांपासून नाशिक पोलीसांची टीम लीलावती रुग्णालयात तळ ठोकून कार्यरत आहे. अँजिओग्राफीचा अहवाल मिळाल्यानंतर तो थेट न्यायालयात सादर केला जाणार आहे.
लीलावती रुग्णालय प्रशासनाने आज दुपारी चार वाजता मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करून कोकाटेंच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती देण्याचे ठरवले आहे. सध्या कोकाटे अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत आहेत आणि उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. रुग्णालयात त्यांची पत्नी सीमा कोकाटे आणि मुलगी सीमंतिनी कोकाटे उपस्थित आहेत. डॉक्टरांच्या प्राथमिक मतानुसार, कोकाटेंना पूर्ण विश्रांतीची आवश्यकता आहे आणि कोणताही मानसिक किंवा शारीरिक ताण टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, आज दुपारी तीन वाजता मुंबई उच्च न्यायालयात माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. या याचिकेत सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, उच्च न्यायालयातील सुनावणीचा थेट संबंध नाशिक मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटशी नाही. नाशिक मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत, मात्र उच्च न्यायालय या आदेशाबाबत स्थगिती देईल का, यावर निर्णय घेणे बाकी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वैद्यकीय अहवाल स्थिर असल्यास आणि वरिष्ठ पातळीवर सल्लामसलत झाल्यानंतर नाशिक पोलीस आजच अटक करण्याचा निर्णय घेऊ शकतात. एकीकडे उच्च न्यायालयातील सुनावणी, दुसरीकडे वैद्यकीय अहवाल आणि तिसरीकडे वरिष्ठ पातळीवरील सल्लामसलत – या सर्व घटकांमुळे प्रकरणाची कायदेशीर स्थिती सध्या अत्यंत गुंतागुंतीची आहे.