देवळी,
navneet-rana : नगरपरिषद निवडणूक प्रचाराच्या अंतिम दिवशी आज १८ रोजी माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा तडस तसेच सदस्यपदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रोड शो व विजय संकल्प यात्रेचे आयोजन यात्रा मैदान देवळी येथे करण्यात आले. यावेळी माजी खासदार नवनीत राणा यांनी काँग्रेसवर जोरदार शब्दांत हल्लाबोल करीत लतरं काढली. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आ. राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, अध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा तडस, नगरसेवक पदाचे उमेदवार राहुल चोपडा आदी उपस्थित होते.

नवनीत राणा पुढे म्हणाल्या की, काही काँग्रेस नेते देवळीत येऊन शोभा तडस यांच्याबाबत अवमानकारक वतव्य करतात. आम्हाला काँग्रेसकडून शिकण्याची गरज नाही. बाहेरून येऊन देवळीकरांना उपदेश करू नये, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने संविधान बचाओ देश बचाओ चा खोटा प्रचार केल्याचा आरोप करत नवनीत राणा म्हणाल्या की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा खरा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. नवीन संसद भवनात संविधान डोयावर घेऊन प्रवेश करणारे मोदीजी हे एकमेव पंतप्रधान आहेत. डॉ. बाबासाहेबांना लोकसभा निवडणुकीत पाडण्याचे कामही काँग्रेसनेच केले आणि आज संविधान बचावाची भाषा करतात. विद्यमान खासदार काळे यांच्यावर टीका करत त्या म्हणाल्या की आज ते कुठेच दिसत नाहीत, संसदेतही नाहीत. ज्यांनी या भागाचा विकास केला त्या रामदास तडस यांना पाडून जनतेने चूक केली. ती चूक पुन्हा करू नका असे आवाहन त्यांनी केले.
देवळी शहरातील मुख्य समस्या म्हणून जमिनीच्या पट्ट्यांचा मुद्दा उपस्थित करत नवनीत राणा म्हणाल्या, अध्यक्षाच्या पाठीशी आमदार आणि सरकार नसेल तर पट्ट्यांचे काम होत नाही. आता पालकमंत्री, आमदार आणि सरकार आपलेच आहे. शोभा तडस निवडून आल्या तर केवळ पट्टेच नव्हे तर पक्की घरे मिळतील. एकाही घरावर टिनाचे छत राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शब्द पाळणारे असून लाडकी बहीण योजना कायम सुरू राहील असेही त्या म्हणाल्या. तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी देवळीतील विकास कामांचा आढावा घेत भाजपाची नगरपरिषद निवडून आल्यानंतर विकासाची गती अधिक वेगाने सुरू राहील. पालकमंत्री म्हणून या नगरपरिषदेला २५ कोटी रुपयांचा विकास निधी देण्याचे आश्वासन देतो असे सांगत २० डिसेंबरच्या निवडणुकीत शोभा तडस व सर्व सदस्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
आ. राजेश बकाने यांनी देवळीकर जनतेच्या आशीर्वादाने मला आमदारकी मिळाली. हे ऋण नगरपरिषद माध्यमातून फेडायचे आहे. त्यासाठी शोभा तडस व सर्व २० सदस्यांना निवडून द्या असे आवाहन केले. माजी खासदार रामदास तडस यांनी ४० वर्षांपासून देवळीकर जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. त्यामुळेच देवळीचा विकास करता आला. पुढेही शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहे या निवडणुकीत भाजपा उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. या सभेला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष वैशाली येरावार, सदस्यपदाचे उमेदवार विलास जोशी यांच्यासह सर्व भाजपा उमेदवार उपस्थित होते. रोडशो व सभेसाठी देवळी शहरात प्रचंड गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.