पुणे,
NCL adulteration detection kit भेसळयुक्त ताडीमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याच्या घटना वारंवार समोर येत असताना, ताडीतील घातक भेसळ ओळखण्यासाठी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (एनसीएल) महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले आहे. ताडीमध्ये आढळणाऱ्या क्लोरल हायड्रेट या गुंगी आणणाऱ्या रसायनाची भेसळ जलद आणि सहजपणे ओळखण्यासाठी ‘सीएचटी-किट’ विकसित करण्यात आले असून, या किटमुळे जागेवरच तपासणी करणे शक्य होणार आहे.
ताडाच्या झाडापासून NCL adulteration detection kit नैसर्गिकरित्या किण्वन प्रक्रियेतून मिळणारी ताडी ही राज्यातील अनेक भागांत लोकप्रिय आहे. सरकारी विक्री केंद्रांतून तिची विक्री केली जाते. नैसर्गिक ताडीमध्ये पाच ते सहा टक्के इथिल अल्कोहोलसह काही आरोग्यदायी घटक असतात. मात्र गेल्या काही वर्षांत ताडीमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने ताडीच्या गुणवत्तेबाबत अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीत उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, ताडी पुरवठादार, एनसीएलचे शास्त्रज्ञ आणि इतर तज्ज्ञांचा समावेश होता.
या समितीच्या अभ्यासातून ताडीमध्ये क्लोरल हायड्रेट या रसायनाची मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे भारतात या रसायनाच्या विक्रीवर बंदी असतानाही ते अनेक ताडी नमुन्यांमध्ये आढळून आले होते. सध्या ताडीच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना विविध उपकरणे सोबत ठेवावी लागतात आणि नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवावे लागतात. त्यामुळे तपासणी अहवाल मिळण्यास मोठा विलंब होत होता.
या अडचणी लक्षात NCL adulteration detection kit घेऊन एनसीएलमधील शास्त्रज्ञांनी सीएचटी-किट विकसित केले आहे. या किटच्या मदतीने ताडीतील भेसळ जागेवरच तपासता येणार आहे. ताडीमध्ये क्लोरल हायड्रेटची भेसळ प्रतिलिटर दहा मिलिग्रॅमपेक्षा जास्त असल्यास ताडीचा रंग गुलाबी होतो, त्यामुळे भेसळ तातडीने ओळखता येते. या किटची वैधता आणि उपयुक्तता राज्य सरकारच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेने तपासून मान्य केली आहे.हे तंत्रज्ञान एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले यांनी टेंभुर्णी येथील ‘ऑथेंटिक केमिकल्स अँड रिसर्च सेंटर’ या संस्थेकडे व्यावसायिक वापरासाठी हस्तांतरित केले आहे. त्यामुळे लवकरच हे किट प्रत्यक्ष क्षेत्रात वापरासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
ताडीमध्ये करण्यात येणारी क्लोरल हायड्रेटची भेसळ अत्यंत धोकादायक आहे. हे रसायन गुंगी आणणारे असून त्याची भेसळ असलेली ताडी पिल्याने व्यसन लागण्याचा धोका वाढतो. शरीरात गेल्यानंतर क्लोरल हायड्रेटचे रुपांतर ट्रायक्लोरोइथेनॉल आणि ट्रायक्लोरोॲसेटिक ॲसिडमध्ये होते. हे दोन्ही घटक आरोग्यास गंभीर नुकसान पोहोचवतात. यामुळे अंगावर लाल चट्टे, उलट्या, पचनसंस्थेचे विकार, अल्सर, अवयवांचे नुकसान तसेच कोमामध्ये जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. दीर्घकाळ या घटकांचा संपर्क आल्यास कर्करोगाचा धोका देखील संभवतो.एनसीएलने विकसित केलेले हे किट प्रत्यक्ष तपासणी प्रक्रियेला गती देणारे ठरणार असून, ताडीतील भेसळ रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.