नागपूर,
pratik-khapre : आधुनिक भारतीय कलेतील महत्त्वपूर्ण स्तंभ आणि बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपचे संस्थापक सदस्य स्व. सदानंद कृ. बाकरे यांच्या १८व्या पुण्यतिथीनिमित्त एस. के. बाकरे मेमोरियल सोसायटीतर्फे आयोजित दोन दिवसीय ‘आर्ट कॉलिंग’ उपक्रमाचा गुरुवारी चिटणवीस सेंटर येथे समारोप झाला. याच अंतर्गत झालेल्या ‘ऑन द स्पॉट पेंटिंग’ स्पर्धेत शासकीय चित्रकला महाविद्यालय, नागपूरचा विद्यार्थी प्रतिक खापरे याने प्रथम क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत नागपूरसह मुंबई, पुणे, हिंगणघाट, पुसद, वर्धा, नवरगाव तसेच कर्नाटकातील एकूण १७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पारितोषिक वितरण समारंभात प्रतिक खापरे याला २१ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. द्वितीय पारितोषिक जे. जे. अकॅडमी, मुंबईच्या कृतिका गोपाल हिने, तर तृतीय क्रमांक शासकीय चित्रकला महाविद्यालय, नागपूरच्या विजया राठोड हिने पटकावला. उत्तेजनार्थ पारितोषिक राहुल पवार, पूजा चेंड्रे, रुतुजा विंडे, शशिकांत काटकर यांना देण्यात आली. उत्कृष्ट कलाकार शिष्यवृत्ती अर्पित उके याला प्रदान करण्यात आली. समारंभास प्रसिद्ध कला इतिहासकार व लेखक प्रा. दीपक कन्नल, ज्येष्ठ भित्तीशिल्पकार अशोक सोनकुसरे, सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद लिंबेकर, सचिव डॉ. सदानंद चौधरी, दिपाली लिंबेकर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी मधू जोशी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्व. चित्रकार चंद्रशेखर वाघमारे यांच्या कुटुंबीयांना मदतनिधी म्हणून १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. या कार्यक्रमाने कला, स्मृती आणि संवेदनशीलतेचा सुंदर संगम साधला.