गोंडपिपरी,
t-115 tiger मध्यचांदा वनविभागांतर्गत गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी आणि गणेशपिपरी परिसरात तब्बल दोन महिन्यांपासून दहशत माजविणारा टी-115 वाघाला अखेर जेरबंद करण्यात आले. 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता पोभुर्णा वनपरिक्षेत्रातील केमारा देवई गावाजवळ वाघाला बेशुद्ध करून ताब्यात घेण्यात वनविभागाला यश आले.
ऑक्टोबर महिन्यात या परिसरात वाघाच्या हालचाली वाढल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत 20 ते 25 जनावरांचा बळी त्याने घेतला होता. त्यानंतर आठवडाभरात दोन शेतकर्यांचे प्राणही घेतले. 18 ऑक्टोबर रोजी चेकपिपरी येथील भाऊजी पाल आणि 26 ऑक्टोबर रोजी गणेशपिपरी येथील अल्का पेंदोर यांना शेतात काम करीत असताना या वाघाने ठार केले होते. या घटनांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आंदोलन छेडत राष्ट्रीय महामार्गावर सुमारे 9 तास वाहतूक रोखून धरली होती. त्यानंतर वनविभाग व प्रशासनाने व्यापक शोधमोहीम हाती घेतली. वाघ पकडण्याची जबाबदारी शार्प शूटर अविनाश झावरु फुलझेले यांच्याकडे सोपविण्यात आली. मुख्य वनसंरक्षक रामानुज यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजता पार पडली. यावेळी सहायक वनसंरक्षक आदेश शेडगे, वनपरिक्षेत्राधिकारी गौरकर, जीवशास्त्रज्ञ पोडचेलवार, क्षेत्र सहायक यादव, वनरक्षक प्रतीक बोबडे, धर्मराव पेंदोर, निलेश वनकर, जीवशास्त्रज्ञ पोडचेलवार यांच्यासह गोंडपिपरी व पोभुर्णा वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. वाघ जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
60 दिवसांपासून मोहिम होती सुरू
वाघाच्या दहशतीने नागरिक भयभित झाले असताना वनविभागाने ‘मिशन फत्ते’ सुरू करून टी-115 वाघाला जेरबंद करण्यासाठी 60 दिवसांपासून मोहिमेचा धडाका लावला होता. तब्बल 60 कर्मचार्यांच्या 4 पथकांसह तीन ड्रोन, एआय कॅमेरे आणि शार्पशूटरच्या मदतीने वाघाचा शोध युद्धपातळीवर सुरू होता.t-115 tiger जीवशास्त्रज्ञ, विशेष वाघ्र संरक्षण दलातील आठ जवान, 4 राऊंड ऑफिसर, 10 बीट गार्ड, 8 बीट मदतनीस, 4 रोपवन चौकीदार तसेच स्थानिक परिस्थितीची जाण असलेल्या 50 सदस्यीय पीआरटी पथकांची नेमणूक करण्यात आली होती.