पवारांचे निकटवर्तीय विशाल तांबेंचा राजकारणातून संन्यास

    दिनांक :19-Dec-2025
Total Views |
पुणे,
Vishal Tambe has retired from politics पुणे महापालिका निवडणुकीच्या अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय माजी नगरसेवक विशाल तांबे यांनी अचानक सोशल मीडियावर पोस्ट करत राजकारणातून संन्यास घेतल्याची माहिती दिली आहे. या निर्णयाने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार गटासाठी मोठा आघात मानला जात आहे. विशाल तांबे पुण्यातील दक्षिण भागात अत्यंत विश्वासू आणि लोकप्रिय नेते मानले जातात. त्यांनी सलग तीन वेळा धनकवडी परिसरातून नगरसेवक म्हणून निवडणूक जिंकली आहे. २००७, २०१२ आणि २०१७ या तीन काळात नगरसेवक म्हणून त्यांनी महापालिकेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. तसेच पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.
 
 

Vishal Tambe has retired 
सोशल मीडियावर पोस्ट करत विशाल तांबे यांनी आपले अनुभव आणि केलेली कामे शेअर करत राजकारणातून संन्यास घेण्याचे कारण स्पष्ट केले. त्यांनी म्हटले की, राजकारण थांबवत असलो तरी समाजकारण आणि निस्वार्थ सेवा सुरू राहील. दक्षिण पुण्यातील अनेक लोकांशी त्यांचा गाढा संपर्क आहे आणि त्यांच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. विशाल तांबे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, आता त्यांनी राजकारणातून पाऊल मागे घेतले तरी समाजसेवा आणि स्थानिक विकासासाठी आपली भूमिका कायम राहणार आहे. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही महापालिका निवडणूक खूप महत्त्वाची ठरत असताना विश्वासू शिलेदाराचे संन्यासाचे निर्णय पक्षाला मोठ्या प्रमाणात प्रभावित करतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.