आर्वीतील बेशिस्त वाहतुकीचे अजून किती बळी?

    दिनांक :19-Dec-2025
Total Views |
आर्वी, 
arvi-indisciplined-traffic : शहरातील वाहतुकीवर कोणाचेही नियंत्रण राहिले नसल्यामुळे दिवसेंदिवस आर्वी शहरातील अपघाताचे प्रमाण वाढत आहे. नगरपालिका व पोलिस यंत्रणेचे उदासीन धोरण याकरता प्रामुख्याने कारणीभूत ठरत आहे. याच उदासीनतेमुळे शहरातील विद्यार्थ्यांचे बळी जात आहे. ही वाहतूक व्यवस्था किती विद्यार्थ्यांचे बळी घेतल्यानंतर नियमित होईल, असा संतप्त सवाल आर्वीकर करीत आहेत.
 
 
JK
 
शहरातून जाणारा तळेगाव-आर्वी हा बहुचर्चित महामार्ग अजूनही पूर्ण न झाल्यामुळे अपघाताचा नवीन अपघाताचे केंद्र (ब्लॉक स्पॉट) निश्चित होत आहे. नगरपालिका इमारत ते बसस्थानकापर्यंत दोन्ही बाजूचे रस्ते बांधून पूर्ण झाले. दुभाजक अजूनही झाले नसल्यामुळे मोठ्या अपघाताची शयता वर्तवली जात आहे. याच महामार्गाच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असून दोन्हीही बाजूला जड वाहने, लहान वाहने उभी राहत असल्यामुळे रस्ता मोठा होऊनही जाण्या-येण्याकरता अडचणीचा सामना करावा लागत आहे.
 
 
आर्वी देऊरवाडा मार्गावरील तीच परिस्थिती कायम आहे. या मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती जिनिंग प्रेसिंग असल्यामुळे जड वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. हेच नव्हे तर ऑटो व जड वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी राहत असल्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण झाल्यामुळे अनेक लहान मोठे अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला.
 
 
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, बस स्थानक, एलआयसी समोर लहान मोठी वाहने भर रस्त्यावर उभी राहत असल्यामुळे लहान मोठे अपघात नित्याची बाब झाली आहे.
 
 
वाहतुकीचे नियम न पाळणारे अपघात झाल्यानंतर मात्र प्रशासन व यंत्रणेला दोष देण्याकरता समोर असतात. शहरातील प्रमुख मार्गावरील तात्काळ अतिक्रमण दूर करून वाहन चालकांना शिस्त व मंजूर झालेला बायपास तात्काळ सुरू करणे गरजेचे आहे. फक्त घटना घडल्यानंतर थातूरमातूर उपाय न करता कायमस्वरूपी उपाय करण्याकरता लोकप्रतिनिधी, प्रशासन, पोलिस, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी एकत्र येऊन कायमस्वरूपी या प्रकारच्या घटनांना आळा घालावा. नाहक कोणाचाही जीव जाणार नाही याकरता उपाय योजना करावी अशी मागणी गेल्या दोन दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीचा अपघातात
जीव गेल्यानंतर करण्यात येत आहे.