वर्धा,
municipal-council-elections : जिल्ह्यातील ६ नगरपालिकांतील नगराध्यक्ष व नगरसेवकांकरिता २ डिसेंबरला मतदान झाले. मात्र, आरक्षण आणि आक्षेपात जिल्ह्यातील देवळी येथील नगराध्यक्षासह वर्धा, हिंगणघाट, पुलगाव येथील २८ उमेदवार अडकले. त्यामुळे उद्या २० रोजी २८ जागांसाठी मतदान होणारा आहे. रविवार २१ रोजी जिल्ह्यातील सहाही नगर पालिकांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी होणार आहे.
नामनिर्देशन अर्जांच्या छाननीच्या दिवशी हिंगणघाट येथे ३, पुलगावात २, देवळीत १ तर वर्धा पालिकेत २ आक्षेप नोंदविण्यात आले होते. ते त्या त्या ठिकाणी फेटाळण्यात आले. त्यामुळे जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागण्यात आली. न्यायालयाकडून २२ नोव्हेंबरपर्यंत निर्णय देणे अपेक्षीत होते. सर्व अपिल न्यायालयाने २४ रोजी खारीज केल्या असल्या तरी ४ नगरपालिकांतील २८ जागांची निवडणुका स्थगित झाली.
वर्धा : वर्धा नगरपालिकेत प्रभाग ९ ‘ब’ व प्रभाग १९ ‘ब’ मध्ये आक्षेप प्राप्त झाला होता. त्यामुळे प्रभाग ९ ‘ब’ व प्रभाग १९ ‘ब’ येथे सदस्यपदासाठी निवडणूक होणाल आहे. हिंगणघाट : हिंगणघाट नगरपालिकेत छाननीच्या दिवशी प्रभाग ५ ‘अ’ व ‘ब’ तर प्रभाग ९ मधील ‘अ’ मध्ये आक्षेप नोंदविण्यात आला होता. तिन्ही अपिल न्यायालयाने खारीज केल्या होत्या. पुन्हा एका प्रभागात दोन आणि एका प्रभागात एक अशा तीन जागांना स्थगिती देण्यात आल्याने तीन जागांसाठी मतदान होणार आहे. पुलगाव : पुलगाव येथे प्रभाग २ ‘अ’ व प्रभाग ५ ‘अ’ मध्ये आक्षेप नोंदविण्यात आल्याने या दोन्ही जागांसाठी निवडणूक होणार आहे. देवळी : देवळी येथे नगर परिषद अध्यक्ष व १० प्रभागातील २० सदस्यपदासाठी निवडणूक होणार होती. येथे अध्यक्ष पदावरच आक्षेप घेण्यात आला होता. हे प्रकरण अपिलासाठी जिल्हा सत्र न्यायालयात गेले. न्यायालयाने अपिल खारीज केली. निवडणूक आयोगाने निर्देश कायम ठेवल्याने देवळी नगरपालिकेचे अध्यक्ष व २० सदस्यपदाची म्हणजेच संपूर्ण देवळी नगरपालिकेसाठी निवडणूक होत आहे.
निरुत्साह
निवडणूक जाहीर झाल्यापासुन प्रचार आणि मतदानासाठी वेळ कमी मिळाल्याने उमेदवारांमध्ये नाराजी होती. त्यानंतर जिल्ह्यातील वर्धा, पुलगाव, हिंगणघाट येथे नगरसेवक तर देवळी येथे नगराध्यक्ष व नगरसेवकांसाठी १९ रोजी निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले. निवडणूक कार्यक्रमही जाहीर झाला. चिन्हही मिळाले. परंतु, उद्या होणार्या मतदानासाठी उमेदवारांसह मतदारांमध्ये फारसा उत्साह नाही. एवढेच नव्हे तर निकालासाठीही फारशी चर्चा होताना दिसुन येत नाही.