रविवारी ५९ टेबलांवर ६ नगरपालिकांसाठी मतमोजणी

* ३१५ कर्मचारी सेवेत; मतमोजणी केंद्रांवर पोलिसांचा पहारा

    दिनांक :19-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
municipal-election-vote-counting : जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणूक रणसंग्रामाचा अंतिम टप्पा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. रविवार २१ रोजी सहा नगर पालिकांसाठी मतमोजणी होणार आहे. प्रशासनाने मतमोजणीची तयारी युद्धपातळीवर पूर्ण केली आहे. ५९ टेबलवरून मतमोजणी होणार असून यासाठी ३१५ अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्र परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 
 
 
municipal-election-vote-counting
 
 
 
जिल्ह्यातील पाच नगरपालिकांतील अध्यक्ष पदांसह १३९ नगरसेवकांच्या निवडीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले होते. त्यासाठी ६०.५० टक्के मतदान झाले. २ लाख ५९ हजार ८०० मतदारांपैकी १ लाख ५७ हजार १६८ मतदारांनी आपला हक्क बजावला. यात ८० हजार ९६६ पुरुष तर ७६ हजार ४६५ महिला आणि ४ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. ही मतदान प्रक्रिया जिल्ह्यातील २८८ मतदान केंद्रांवर पार पडली.
 
 
सिंदी (रेल्वे) नगरपालिकेत ७१.२२ टक्के मतदान झाले असून सर्वाधिक मतदानाची नोंद येथे झाली. हिंगणघाटमध्ये ६२.२०, आर्वीत ६१.२७, पुलगावमध्ये ५९.१९ तर वर्धेत ५७.३३ टक्के मतदान झाले आहे. या मतदानातून कोणाला कौल मिळाला हे २१ डिसेंबरला स्पष्ट होणार आहे.
 
 
मतमोजणी प्रक्रिया सकाळी ८ वाजतापासून सुरू होणार आहे. पोस्टल बॅलेटसाठी स्वतंत्र टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व टेबलांवर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून त्यांच्या उपस्थितीतच मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश खताळे यांनी दिली.
 
 
मतमोजणी पूर्णपणे पारदर्शक व्हावी यासाठी ही प्रक्रिया ऑन-कॅमेरा केली जाणार आहे. मतमोजणी स्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून केंद्राच्या २०० मीटर परिसरात कडक निर्बंध लागू राहणार आहेत.
 
 
*वर्धा नगर पालिका
 
 
टेबल : १६ | फेर्‍या : ०७ | कर्मचारी : ८६
*हिंगणघाट नगर पालिका
टेबल : १४ | फेर्‍या : ११ | कर्मचारी : ११६
*आर्वी नगर पालिका
टेबल : १३ | फेर्‍या : ०४ | कर्मचारी : ४२
*पुलगाव नगर पालिका
टेबल : ०६ | फेर्‍या : ०६ | कर्मचारी : ३२
*देवळी नगर पालिका
टेबल : ०४ | फेर्‍या : ०४ | कर्मचारी : १४
*सिंदी (रेल्वे) नगर पालिका
टेबल : ०६ | फेर्‍या : ०४ | कर्मचारी : २५