तभा वृत्तसेवा
हदगाव,
sandeep-bhure-bjp : काँग्रेसचे हदगाव येथील माजी नगरसेवक तसेच आरजीएस शैक्षणिक संस्थेचे संचालक संदीप भुरे आणि पैनगंगा मल्टीस्टेट अर्बन सोसायटीचे संचालक कमलकिशोर तावडे यांनी नांदेड येथे भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडला.
यावेळी मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे, माजी आमदार व महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. संदीप भुरे यांच्यासोबत जिल्हा परिषद आष्टी गटातील श्रीकांत ठोंबरे, सागर शेरे, आकाश काळे, गजानन सूर्यवंशी, श्रीकांत वाघमारे यांनीही भाजपात प्रवेश केला.
या पक्षप्रवेश कार्यक्रमात माजी आमदार व महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पक्षप्रवेशानंतर हदगाव येथे शिरीष मनाठकर, डॉ. भगवान निळे, भाजपा शहराध्यक्ष बाळा कदम, आनंद कांबळे तसेच इतर मान्यवरांनी संदीप भुरे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
हदगाव तालुक्यात भाजपाचे संघटन मजबूत करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री अतुल सावे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्याचे लोकनेते माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात तसेच मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्या सहकार्याने हदगाव तालुक्यात भाजपाचे संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे भुरे यांनी सांगितले. यासाठी शिरीष मनाठकर, तातेराव वाकोडे, हदगाव मध्यमंडळ अध्यक्ष बाळा कदम यांच्यासह पक्षातील जुने-नवे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भाजपा विचाराचा वर्ग वाढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.